Sangamner Crime: बैलांची वाहतूक करणारा कंटेनर ताब्यात; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांमुळे पुढील अनर्थ टळला!
esakal January 02, 2026 05:45 AM

संगमनेर: तालुक्यातील कुरण येथून कत्तलीसाठी गोवंश जनावरे कर्नाटक राज्यात नेत असलेल्या तस्करांवर पोलिसांनी कारवाई करत गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आणला. पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी शिवारातील जावळेवस्ती येथे बुधवारी (ता.३१) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या पथकाने कंटेनरला अडवून त्यातून २८ गोवंश जातीचे बैल ताब्यात घेतले. कारवाईत एकूण ३२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

Army Success Story: शेतीतून थेट सीमेपर्यंतचा प्रवास; शेतकऱ्याच्या मुलानं गाठलं भारतीय लष्करातील 'लेफ्टनंटपद'

तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुरण परिसरातून कंटेनरद्वारे २८ बैल कत्तलीसाठी कर्नाटक राज्यात नेले जाणार असल्याची गोपनीय माहिती गुप्त खबऱ्यामार्फत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश देत पथक तयार केले.

पोलिस नाईक बापूसाहेब हांडे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे व सुनील ढाकणे यांनी बुधवारी पहाटे जावळेवस्ती येथे संशयित कंटेनर अडवला. कंटेनरची तपासणी केली असता आतमध्ये अत्यंत दाटीवाटीने कोंबलेले गोवंश जातीचे मोठे २८ बैल आढळून आले. या प्रकरणात १२ लाख ६० हजार रुपये किमतीचे २८ बैल व २० लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ३२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

माेठी बातामी! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; वारसाहक्काने मिळालेली जमीन ‘स्वतंत्र मालमत्ता’, मुलांना दणका..

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद रिजवान दस्तगीर (रा. नरसिम्हा नायकानगर, होले नरसिपूर, हसन, कर्नाटक) यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेले सर्व २८ गोवंश बैल सुरक्षितपणे सायखिंडी येथील गोशाळेत नेऊन सोडले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.