वडगाव मावळ, ता. १ : येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेत आनंद बाजार उत्साहात संपन्न झाला. पालकांनी बाजारात विविध वस्तूंची खरेदी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान वाढवून त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करण्याच्या उद्देशाने येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक शाळेत आनंद बाजार भरविण्यात आला होता. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान कादे यांच्या हस्ते आनंद बाजारचे उद्घाटन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे गुरुकुल समन्वयक आर. एन. देशपांडे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. त्यात साबुदाणा वडा, सामोसे, वडापाव, पाणीपुरी, पोहे, चकली, चॉकलेट, हिरव्या भाजीपाला, नूडल्स, गुलाबजामून, पापड, चाट आदी पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. विद्यार्थ्यांनी त्यांची विक्री करून व्यावहारिक ज्ञान अनुभविले.
प्राचार्य सतीश हाके यांनी आनंद बाजाराचे महत्त्व विषद केले व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षक व पालकांनी ग्राहक बनून विद्यार्थ्यांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. आनंद बाजार यशस्वितेसाठी मुख्याध्यापक नंदकुमार खाडे, ज्येष्ठ शिक्षक किरण नवले, स्वाती खुडे, नीलेश गवई, सारिका अवचारे, सुमन दळवी, कीर्ती वहिले, वैष्णवी नांगरे, रीमा शिंदे, रेश्मा गायकवाड आदींनी संयोजन केले. किरण नवले यांनी सूत्रसंचालन केले तर स्वाती खुडे यांनी आभार मानले.