निगडी, ता. १ ः दीर्घ खंडानंतर होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी मिळविण्यापासून अगदी एबी फॉर्म पळविण्यापर्यंत चढाओढ होत आहे. सर्वच पक्षांतील उमेदवार प्रतिस्पर्ध्यावरच नव्हे तर स्वक्षीयांवरही कुरघोडी करण्यासाठी सर्वस्व पणास लावत आहेत. राजकारणातील खिलाडूवृत्ती कमी झाल्याची टीका कितीही होत असली तरी लढतीपूर्वीच प्रतिस्पर्ध्याला चीतपट करण्याचा नवा डाव खेळला जात आहे.
अनेक जण प्रतिस्पर्ध्याची उमेदवारीच बाद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पक्षांतर आणि फोडाफोड टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी अगदी शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म दिले. कुणाला एबी फॉर्मची लॉटरी लागणार याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. त्यामुळे पक्षाने नेमके तिकीट कुणाला दिले, याची उत्सुकता कमालीची ताणली गेली. याचा एक परिणाम असा झाला की, आपल्याच पक्षात आपले भवितव्य टांगणीला लागल्यामुळे काही जणांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांशी वाटाघाटी करण्यास फारच कमी वेळ मिळाला.
खुल्या मनाने निवडणूक लढण्याऐवजी तांत्रिक मुद्द्यांवर भर देऊन प्रतिस्पर्ध्याची कोंडी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यामुळे आता जसजशी निवडणूक पुढे जाईल तसतशा वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविण्यात येतील. शुक्रवारी शेवटच्या क्षणी कोण माघार घेतो व कोण रिंगणात राहतो, याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर चुरस आणखी वाढेल.
---
अधिकाऱ्यांचे काम वाढले
उमेदवारी अर्जांची प्रचंड संख्या व त्यामुळे निवडणूक यंत्रणेची वाढलेली डोकेदुखी हा स्वतंत्र विषय आहे. त्याआधी हरकतींचा पाऊस पडला. आपापल्या प्रभागातील प्रतिस्पर्ध्याच्या अर्जावर, कागदपत्रांवर व इतर बाबींवर हरकत नोंदवण्यासाठी अनेकांनी कंबर कसली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे काम वाढले. छाननीच्यावेळीच सगळ्यांच्या हरकती ऐकून त्यावर निर्णय देता त्यांना कसरत करावी लागली. काही बाबतीत हरकतीवरील निर्णय आपल्या अखत्यारित नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
-----