Ramdas Athawale News : दुखावलेल्या आठवलेंनी CM फडणवीसांची भेट घेत टाकला डाव; एक आमदार, मंत्रिपद, मंहामंडळे अन् बरंच काही...
Sarkarnama January 02, 2026 11:45 AM

Municipal elections Maharashtra : मुंबईसह राज्यातील कोणत्याही महापालिकेच्या जागावाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाला विचारातच न घेतल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले चांगलेच संतापले होते. महायुतीने आपला विश्वासघात केल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

मुंबईसह ठाण्यात पक्षाच्या उमेदवारांना महायुतीतून जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. फडणवीस यांनी मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांना लगेच फोन करून जागा सोडण्याबाबत बोलणी केल्याचा दावाही आठवले यांनी केला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत आठवले यांच्या पक्षाला जागा मिळण्याची आशा आहे.

दरम्यान, एकीकडे जागावाटपात सन्मान न मिळाल्याने दुखावलेल्या आठवलेंनी फडणवीसांकडे आठ मागण्या करत राजकीय डाव टाकला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीसह एका मंत्रिपदाची मागणीही केली आहे. त्याचप्रमाणे विविध महामंडळांमध्ये दोन अध्यक्षपदासह उपाध्यक्षपद तसेच ५० महामंडळामध्ये सदस्यपद मिळावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

BJP Politics : मुनगंटीवारांनी काडी टाकली, 'लाडक्या बहिणीं'नी धाडस दाखवत सुरूंग लावला...

मुंबई महापालिकेत दोन स्वीकृत सदस्य व काही समित्यांवर सदस्य, इतर महापालिकांमध्ये प्रत्येक एक स्वीकृत सदस्यपदाची मागणीही आठवले यांनी फडणवीसांकडे केली आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जागावाटपामध्ये पक्षाचा विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Mahapalika Election Update : फडणवीस-शिंदे तीन दिवसांत डाव टाकत निवडणुकीचं चित्रच पालटणार?

रामदास आठवले यांनी केलेल्या मागण्या -

१.       एक विधान परिषद सदस्य आणि राज्यात एक मंत्रिपद

२.       दोन महामंडळांचे अध्यक्षपद

३.       महामंडळांचे दोन उपाध्यक्षपद

४.       ५० महामंडळांचे दोन संचालकपद

५.       मुंबई महापालिकांमध्ये दोन स्वीकृत सदस्य व काही समित्यांवर सदस्यपद

६.       महाराष्ट्रातील उर्वरित २८ महापालिकांमध्ये प्रत्येकी एक स्वीकृत व काही समित्यांवर सदस्य.

७.       निवडणुका झालेल्या नगरपरिषद व नगरंपचायतींमध्ये काही समित्यांवर सदस्यपद

८.       आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्य रिपब्लिकन पक्षाला सन्मानाचे स्थान देऊन महायुतीत सामावून घेणे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.