Indore Water Crisis: इंदौरमध्ये दूषित पाण्यामुळे कहर! रुग्णांच्या भेटीला धावले CM मोहन यादव; ४० हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
esakal January 02, 2026 04:45 PM

मध्य प्रदेशातील इंदौर शहरात दूषित पाण्यामुळे उद्भवलेली आरोग्य आणीबाणी पाहता मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा ताबा घेतला आहे. मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी इंदौरमधील वर्मा रुग्णालय, विमा रुग्णालय, एम.वाय. रुग्णालय यांसह विविध खासगी रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णांची विचारपूस केली. "घाबरू नका, तुम्ही लवकरच बरे होऊन घरी परताल, तुमच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करेल," अशा शब्दांत त्यांनी बाधितांना धीर दिला. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे पुरवण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसांत भागीरथपुरा परिसरातील ४० हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार ४५६ संशयित रुग्णांमध्ये लक्षणे दिसून आली असून २१२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील ५० रुग्ण आता पूर्णपणे बरे होऊन घरी परतले असून १६२ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या झोन क्रमांक ४ च्या झोनल अधिकाऱ्यासह दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर एका उपअभियंत्याला थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव संजय दुबे यांना इंदौरमध्येच मुक्काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या या भागात टँकरद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असून, जुन्या आणि खराब झालेल्या जलवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Mumbai Pollution: वायुप्रदूषणाने घुसमट! बीकेसीमध्ये गुणवत्ता निर्देशांक पोहोचला ३३५वर
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.