बघता बघता २०२५ साल संपून २०२६चा शुभारंभ झाला. नवीन वर्ष सुखसमृद्धीने परिपूर्ण जावो, आरोग्यपूर्ण असो अशा शुभेच्छाही एकमेकांना देऊन झाल्या. आता या सर्व शुभकामना प्रत्यक्षात याव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत. यश, समृद्धी, समाजात मान, प्रतिष्ठा वगैरे सर्वांच्या मुळाशी असते ते आरोग्य. आरोग्याचे रक्षण करणे किंवा ते परत मिळविणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य असते.
आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये एक श्र्लोक दिलेला आढळतो,
नगरी नगरस्येवरथस्येवरथी सदा।
स्वशरीरस्य मेधावी कृत्येष्ववहितोभवेत्॥
...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
ज्याप्रमाणे एखाद्या नगराचा पालक आपल्या नगराची काळजी घेतो, ज्याप्रमाणे रथ चालविणारा रथी आपल्या रथाची यथायोग्य देखभाल करतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्याने स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला हवे.
रथ काय, आजच्या काळातील कार काय किंवा घर-कारखान्यातील एखादे यंत्र काय, या सर्व गोष्टींची सुरुवातीपासूनच नीट देखभाल आपण करतो. वेळेवर सर्व्हिसिंग करणे, कॅलिब्रेशन करणे, चांगल्या प्रकारचे इंधन व तेलाचा पुरवठा करणे, एका वेळी अधिक भार येणार नाही याकडे लक्ष ठेवणे, गाडी असल्यास ती वाईट रस्त्यांवरून न चालवणे अशा अनेक गोष्टी आपण सांभाळतो. आरोग्य टिकविण्यासाठी तर यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी लक्ष द्यायला हवे. जन्मजात आरोग्य किती मोलाचे आहे हे ते बिघडल्याशिवाय बहुधा समजत नाही, पण आयुर्वेदिक संकल्पनेनुसार ‘आरोग्यरक्षण’ हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे, तेही नुसते शरीराचे आरोग्य नाही तर मनाचे, इंद्रियांचे व आत्म्याचे आरोग्य नीट राहील, यासाठी प्रत्येकाने दक्ष रहायलाच हवे.
जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा पहिला प्रश्र्न, ‘कशी काय आहे तब्येत?’ हाच असतो. मुले-बाळे ज्यावेळी दूर राहत असतील तेव्हा त्यांच्या तब्येतीची काळजी वडिलधाऱ्यांना व वृद्ध मात्यापित्यांच्या प्रकृतीची काळजी मुलांना असते. म्हणजेच काय की निरामय आरोग्य व सुदृढता हेच सर्वांचे पहिले लक्ष्य असते. ‘सिर सलामत तो पगडी पचास’ असे जे म्हटले जाते ते उगाच नाही. कारण जीवनाची सर्व सुखे शरीर नसले तर उपभोगणार कशी? समाधान जरी मानसिक असले तरी मनाला बरेचसे शरीरस्वास्थ्यावरच अवलंबून राहावे लागते.
एखादी व्यक्ती भेटल्यावर ‘तुझी तब्येत छान दिसत आहे’ असे म्हटले म्हणजे खूप आनंद होतो. अर्थात या छान दिसण्यात निरामयता, सृदृढता व ओज ह्या गोष्टी अवलंबून असतात. पण त्या उलट जर कोणी ‘वा, फार छानच झाली आहे तब्येत’ असे म्हटले तर हा शेरा वाढलेल्या पोटावर व बेढबपणावर दिलेला आहे हे लक्षात येते. मनुष्य बुटका, उंच, किडकिडीत, जाड कसाही असला तरी तो सुदृढ व निरामय असावा. म्हणजे त्याचे शरीर लवचिक, वळणदार, तेजःपुंज असून तो स्वतःची सृजनशक्ती दाखवण्यास अर्थात सर्व दैनंदिन व्यवहार करण्यास समर्थ असायला हवा.
पित्ताचा रजोगुण घेतल्याशिवाय काम करण्याची इच्छा व स्फूर्ती मिळणारच नाही. पण या पित्ताच्या असंतुलनातून शरीरात उरलेला आंबट, चिकट तेज-अम्लगुणधर्माचा पदार्थ साठत राहतो. रोज पोट साफ झाले, मूत्रविसर्जन व्यवस्थित झाले तरी प्रत्येक आठवड्यात एकदा विशेष दक्षता घेऊन हे आमद्रव्य शरीराबाहेर काढावे लागते. तसेच विशिष्ट वयानंतर कधीतरी अधिकच कडक उपाय योजून विधिपूर्वक सर्व दोष शरीराबाहेर काढावे लागतात अन्यथा कोणत्या ना कोणत्या प्रकारचे साध्य, कष्टसाध्य, असाध्य रोग होतात. आणि म्हणूनच सुदृढ शरीराची अपेक्षा धरणाऱ्याला प्रथम निरामय शरीराची व्यवस्था ठेवावी लागेल.
खाणे-पिणे, योग, व्यायाम एवढ्यावरच शरीर निरामय व सुदृढ ठेवता येत नाही. योगसूत्रात पण प्रथम यम-नियमासारख्या गोष्टींना महत्त्व दिलेले सापडते. मनात एकदा का क्रोध, द्वेष, हट्टीपणा वगैरेंनी घर केले की सर्व आरोग्य बिघडून जाते. मानसिक ताण हा तर आमाच्या संचयाचे एक महत्त्वाचे कारण आहे. सदाचार, सद्वृत्ती, सामाजिक स्वास्थ्य, ध्यान, ईशचिंतन ह्या गोष्टीही निरामयतेसाठी आणि चांगल्या शरीर व व्यक्तीमत्वासाठी अत्यंत अत्यंत आवश्यक असतात. केवळ आयुर्वेदाचा ‘पंचाक्षरी मंत्र’च आपल्याला संपूर्ण निरामयता आणि सर्व प्रकारचे सुख देऊ शकतो.
आरोग्याच्या नव्या व्याख्येप्रमाणे शरीर व मनाबरोबरच सामाजिक आरोग्य आणि आत्मिक (आध्यात्मिक आरोग्य) ही कल्पना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्वीकारलेली आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व व सुदृढ शरीर असलेला मनुष्य जर माणूसघाणा असला किंवा अशिक्षित असला तर त्याला महत्त्व राहणार नाही. निरामयता केवळ शरीरापुरती मर्यादित न ठेवता मानसिक व अध्यात्मिक शरीराला पण लागू करावी लागेल.
दुसऱ्याची बाजू समजावून न घेणे, रागावल्याने काम बिघडते हे समजून घेणे, ईर्ष्या व द्वेष करण्यामुळे स्वतःची प्रगती थांबेल हे लक्षात घेणे अशी मनाची निरामयता, चार चौघांबरोबर जमवून घेऊन टीमवर्क हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे समजून वागणे, समाजाने आपल्याला बरेच दिले आहे तेव्हा सामाजिक नियमांचे पालन बंधन स्वीकारून समाजालाही काहीतरी देणे ही सामाजिक निरामयता आणि शरीर हे जरी नश्र्वर असले तरी सत्कृती मागे उरणार हे ध्यानी घेऊन काहीतरी कार्य करणे, सर्वाभूतीआत्मभाव पाहून प्रेम वाढवणे.
चांगल्या कार्यासाठी अदृश्य शक्ती कायमच मदत करत असते, हे समजून घेऊन त्या शक्तिप्रति कृतज्ञ राहणे आणि स्वतःमधील व अशा परमशक्तीवरील विश्र्वास वाढवणे ही अध्यात्मिक निरामयता आणि अशा प्रकारे सर्वंकष निरामयता म्हणजेच खरा ‘जीवनानंद!’
पुन्हा एकदा सर्वांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)