UP: भूमाफियांवर 'बुलडोझर' प्रहार; आजारी मेजरच्या लेकीला २४ तासांत परत मिळाले घर, अंजना म्हणाली- 'थँक्यू योगी अंकल!'
esakal January 02, 2026 04:45 PM

दबंग भूमाफियांनी बळकावलेले आपले हक्काचे घर परत मिळेल, अशी आशा सोडून दिलेल्या अंजना नावाच्या तरुणीसाठी नवीन वर्षाची सुरुवात सुखाची ठरली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कडक सूचनेनंतर, अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी कारवाई करत अंजना यांचे कोट्यवधींचे घर भूमाफियांच्या तावडीतून सोडवून त्यांच्या ताब्यात दिले. आपल्या वडिलांचे घर पुन्हा मिळाल्यावर भावूक झालेल्या अंजनाने डोळ्यांत पाणी आणून "गॉड ब्लेस यू योगी अंकल" असे म्हणत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

योगी सरकारचा २०२६ साठी मास्टर प्लॅन, एका वर्षात १ कोटी महिला बनणार 'लखपति दीदी'!

अंजना यांचे वडील बिपिन चंद्र भट्ट हे लष्करात मेजर होते. १९९४ मध्ये त्यांच्या निधनानंतर आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या मृत्यूमुळे अंजना एकट्या पडल्या होत्या. सीजोफ्रेनिया या मानसिक आजारामुळे २०१६ पासून त्या एका पुनर्वसन केंद्रात उपचार घेत आहेत. अंजना यांच्या आजारपणाचा फायदा उठवून बलवंत यादव आणि मनोज यादव या भूमाफियांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या इंदिरानगरमधील घरावर कब्जा केला होता आणि स्वतःचे फलक लावले होते. स्थानिक पातळीवर तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने अखेर अंजना यांनी बुधवारी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

एका सैनिकाच्या मुलीची व्यथा ऐकून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. या आदेशानंतर पोलीस यंत्रणा चक्रावून हालली आणि गुरुवारी दुपारपर्यंत भूमाफियांना हाकलून देऊन घराचा ताबा अंजना यांना देण्यात आला. जेव्हा अंजना आपल्या घरात शिरल्या, तेव्हा त्यांनी घरातील भिंतींचे मुके घेतले आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. घराबाहेर नारळ फोडून आणि दीप प्रज्वलित करून त्यांनी आपल्या हक्काच्या घरात पुन्हा प्रवेश केला.

मुख्यमंत्र्यांच्या या संवेदनशीलतेमुळे एका हतबल महिलेला न्याय मिळाला असून, दबंगांच्या विरोधात सरकारने दिलेला हा कठोर संदेश सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पुनर्वसन केंद्राचे डॉक्टर आणि स्थानिक रहिवाशांनीही सरकारच्या या तत्परतेचे स्वागत केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.