Latest Marathi News Live Update : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांची अजित पवार यांच्यासोबत बैठक
esakal January 02, 2026 04:45 PM
Pune Live : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांची अजित पवार यांच्यासोबत बैठक

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांची अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली असून दोन्ही पक्षांतील जागांचा तिढा सुटल्याचे सांगण्यात आले आहे.

Live Update: 'दोन्ही पक्षाचे नेते आज बैठकीत निर्णय घेतील' - सुनील टिंगरे

दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी एकाच प्रभागातून अर्ज दाखल केला होता, परंतु आता ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याला तिथे संधी दिली जाईल. दोन्ही पक्षाचे नेते आजच्या बैठकीत हा निर्णय घेतील. 9 ठिकाणी उमेदवारी अर्ज आहेत जिथे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, अशा उमेदवारांसोबत चर्चा होईल. आम्ही 125 उमेदवारी अर्ज दिले होते, त्यांनी 35 पेक्षा जास्त AB फॉर्म दिले होते. राष्ट्रवादी आणि खरात गटाची युती असेल. मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली काही लोक आहेत, परंतु त्यांना RPI गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, ते निर्णय घेतील.

Amravti Liveupdate: अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रवी राणा यांच्या भेटीला

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रवी राणा यांची भेट घेतली. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने महापालिका निवडणुकीत युती असूनही 41 उमेदवार उभे केले, ज्यामुळे भाजपला नुकसान होऊ शकते. उमेदवार मागे घेण्यासाठी बावनकुळे यांनी रवी राणा यांची भेट घेतली. आमदार रवी राणा आणि बावनकुळे यांच्यात रवी राणा यांच्या भानखेडा येथील फार्म हाऊसवर बंद दरवाजामागे चर्चा झाली.

NashikLivupate : नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे गिरीश महाजन यांच्या भेटीला

भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. मुकेश शहाणे हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी पोहोचले. भाजपच्या अधिकृत उमेदवारी यादीत मुकेश शहाणे यांचे नाव होते, परंतु सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांनी शहाणे यांच्या आधी AB फॉर्म भरल्यामुळे मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला. अर्ज बाद झाल्यामुळे मुकेश शहाणे अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले आहेत. दीपक बडगुजर यांच्या माघारीसाठी मंत्री गिरीश महाजन मध्यस्थी करत आहेत. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार देखील काही वेळापूर्वी गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी पोहोचले. बंडखोर आणि अपक्षांच्या माघारीसाठी मंत्री महाजन प्रयत्नशील आहेत.

Nagpur live : भाजप उमेदवाराला घरातच कोंडलं

नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळत आहे. भाजप उमेदवाराला घरात कोंडून ठेवलं आहे. त्यांनी अर्ज माघारी घेऊ नये म्हणून त्यांना घरात कोंडून ठेवले आहे.

Nashik Live : नाशिकमध्ये भाजपात उमेदवारीचा गोंधळ, तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेची मात्र प्रचारात आघाडी

एकीकडे भाजपमध्ये उमेदवारीचा गोंधळ, तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेची मात्र प्रचारात आघाडी

- सिडको विभागात भाजपने २ उमेदवारांना AB फॉर्म दिल्यानं सुरू आहे गोंधळ

- बंडखोरांना रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून

- तर दुसरीकडे त्याच सिडको विभागात शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात

- बाईक रॅलीच्या माध्यमातून शिंदेंच्या शिवसेनेकडून सिडको विभागात जोरदार शक्तिप्रदर्शन

- आमच्याकडे सर्व निष्ठावान, शिंदेंच्या उमेदवारांची भाजपवर टीका

Pune Live : पुण्यात महायुती तुटल्याचे स्पष्ट संकेत, अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता

अर्ज माघार घेण्यासाठी काही वेळ शिल्लक,अजूनपर्यंत शिवसेनेकडून अर्ज माघार घेण्याचे आदेश नाहीत

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही तासाचा अवधी उरला आहे असे असताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यामध्ये जागावाटपांचे सूत्र निश्चित झाले नाही.त्यामुळे महायुती तुटल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये; पत्रकार परिषद घेणार

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी अजित पवार पिंपरी चिंचवड मध्ये

पिंपरी चिंचवड महापालिका मधील होणाऱ्या भ्रष्टाचार विरोधात अजित पवारांचा हल्लाबोल होणार

पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारांची आज पत्रकार परिषद

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची पत्रकार परिषद

संध्याकाळी ५ वाजता अजित पवारांची पत्रकार परिषद

संभाजीनगरच्या २ मृत शिक्षकांना 'इलेक्शन ड्यूटी'

संभाजीनगरच्या २ मृत शिक्षकांना 'इलेक्शन ड्यूटी'

दोन शिक्षकांवर महापालिका निवडणुकीसाठी मतदान अधिकारीपदाची जबाबदारी सोपवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

१३ महिन्यांपूर्वी मृत झालेल्या दोन शिक्षकांना प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस बजावत कारवाईचा इशाराही दिला आहे.

पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले यांचे ३ महिन्यांपूर्वी, तर राजेश बसवे यांचे १३ महिन्यांपूर्वी निधन झाले. असे असतानाही त्यांना निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानंतर चुकीची उपरती न झालेल्या प्रशासनाने आता या मृत शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावत हलगर्जीपणाचा कळस गाठला.

यामुळे नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे, आम्ही सगळे कागदपत्र सादर करूनही इलेक्शन ड्युटी लावली आहे. आमचे माणसं नसतानाही आमच्या भावना दुखावल्या जात आहे.

माजलगाव तालुक्यातील 90 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या कॉपर वायरची चोरी

माजलगाव तालुक्यातील गोदाकाठावरून 90 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या कॉपर वायरची चोरी.

- 90 शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे कॉपर वायर केले लंपास.

- या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Live : मुंबईत भेसळयुक्त दुधाचा मोठा पर्दाफाश

मुंबईत वर्सोवा पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत अमूल आणि गोकुळ दुधात पाणी मिसळून भेसळ करणाऱ्यामुंबईत भेसळयुक्त दुधाचा मोठा पर्दाफाश सातत्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. अंधेरी प. येथील नवजीतनगर परिसरात पहाटे छापा मारून ७ आरोपी पकडले गेले. नामांकित कंपन्यांच्या ताजा, गोल्ड, A-2 तसेच सात्विक व क्लासिक पिशव्यांचा गैरवापर करून दूध भरण्याची कारवाई उघड झाली. दुधाच्या पिशव्या अनियमितपणे सील केल्याचेही आढळले, ज्याद्वारे ग्राहकांची फसवणूक करून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. एकूण ९५८ लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट करण्यात आले, तर ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (गुन्हा क्र. 1105/2025, BNS व अन्नसुरक्षा कायद्यान्वये कारवाई). पुढील तपास वर्सोवा पोलिसांकडून सुरू आहे.

Nashik Live: नाशिक महापालिका निवडणूक: महाविकास आघाडीच्या रणनीतीत फूट?

नाशिकमध्ये महाविकास आघाडीत सध्या तणाव जाणवत आहे. काही प्रभागांमध्ये युतीधर्म पाळण्यात आलेला नाही, ज्यामुळे दोन ते तीन पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काल महत्वाची बैठक पार पडली, ज्यात पुढील रणनीतीवर चर्चा झाली. आता पाहणे महत्वाचे आहे की आज कोण कोण माघार घेणार आणि कोण कोण उभा राहणार, कारण त्यावरच महापालिका निवडणुकीच्या चित्राचा मोठा भाग अवलंबून आहे.

Nagpur Live: नागपूर मनपा निवडणुकीत भाजप–काँग्रेसची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघणार?

नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी उफाळून आली असून, तिकीट नाकारल्याने भाजपचे ५० हून अधिक तर काँग्रेसचे १५ पेक्षा जास्त माजी नगरसेवक नाराज झाले आहेत. या नाराज नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बंडखोर उमेदवार पक्षाच्या मतांमध्ये फूट पाडू शकतात, त्यामुळे निकालावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून भाजप आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवसभर बंडखोरांची मनधरणी करण्यात गुंतले असून, नातेवाईक, मित्र आणि स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून अर्ज मागे घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने बंडखोर उमेदवार माघार घेतात की मैदानातच टिकून राहतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Municipal Elections : अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस; दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पहिल्या दिवशी बहुतांश डमी म्हणून भरलेले अर्ज माघार घेण्यात आले. सात निवडणूक कार्यालयांतून डमी ४८ अर्ज माघार घेण्यात आले. शुक्रवारी (ता.२) माघारीचा शेवटचा दिवस असून, दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीसाठी मोठी गर्दी तसेच तणावाचेही वातावरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्तही तैनात ठेवला आहे.

Zilha Parishad Election : जिल्हा परिषद निवडणूक सोमवारी जाहीर होण्याची शक्यता

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच नवीन वर्षात जिल्हा परिषद निवडणूक सोमवारी (ता. ५) किंवा मंगळवारी (ता. ६) जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय कामांना गती आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवरूनही तशा सूचना दिल्या जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

Gas Cylinder Rates : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडर १११ रुपयांनी महागले

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात १११ रुपयांनी वाढ केली आहे. सीएनजी आणि पीएनजी वायूच्या दरात मात्र दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात सीएनजीचे दर ९६.५० रुपयांवरून ९४.५० रुपयांपर्यंत, तर दिल्लीत ७७ वरून ७५ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. तेल कंपन्यांकडून विमानाच्या इंधन दरात (एटीएफ) कपात करण्यात आली आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या सांगलीत प्रचार सभा

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी (ता. ३) भाजपचा प्रचार प्रारंभ होणार आहे. येथील गणपती मंदिरासमोर श्रीफळ वाढवून फेरीस प्रारंभ होईल. येथील स्टेशन चौकात जाहीर सभा होईल. प्रचाराचा प्रारंभच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. आज सभेच्या नियोजनासाठी नेत्यांची बैठक झाली.

Marathi Sahitya Sammelan : माचीगड-अनगडी येथे रविवारी २९ वे मराठी साहित्य संमेलन

खानापूर : तालुक्यातील ‘सुब्रम्हण्य साहित्य अकादमी, माचीगड-अनगडी’ यांच्यातर्फे ‘२९ वे मराठी साहित्य संमेलन’ रविवारी (ता. ४) सकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात होणार आहे. संमेलनाध्यक्षा म्हणून कवयित्री व लेखिका प्रा. डॉ. संजीवनी तडेगावकर, जालना उपस्थित राहणार आहेत.

Devendra Fadnavis : बंडोबांना शांत करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी घेतला पुढाकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले सक्रिय

Latest Marathi Live Updates 2 January 2026 : राज्यभरात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या बंडोबांना शांत करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी पुढाकार घेतला आहे. सत्ताधारी महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपच्यावतीने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत. तसेच नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात १११ रुपयांनी वाढ केली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी (ता. ३) सांगलीत भाजपचा प्रचार प्रारंभ होणार आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.