15118
स्वच्छ समुद्र किनारे सिंधुदुर्गचा आरसा
सीईओ खेबुडकर ः नववर्षारंभी ३३ किनाऱ्यांवर स्वच्छता
सकाळ वृ्त्तसेवा
ओरोस, ता. २ ः स्वच्छ समुद्र किनारे हा जिल्ह्याचा आरसा आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे येणारे देशी-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यांना भेट देतात. जर आपण पर्यटकांना स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे देऊ शकलो, तर भविष्यात याहून अधिक पर्यटक जिल्ह्याला भेट देतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी व्यक्त केला.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून काल (ता. १) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर श्रमदानाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेचा प्रारंभ वेंगुर्ला तालुक्यातील मेढा समुद्र किनारी करण्यात आला. मेढा ग्रामपंचायतीचे सरपंच अवधुत रेगे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कृषी अधिकारी दिंगशांत कोळप, पाणी व स्वच्छता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, रुपाजी किनळेकर, मनीष पडेत, स्नेहल पिंगुळकर आदी उपस्थित होते.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण ३३ समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता कार्यक्रम राबविले. या मोहिमेत एकूण १७७९ किलो कचरा संकलित केला असून त्यामध्ये १०३५ किलो प्लास्टिक कचऱ्याचा समावेश आहे. संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती श्री. खेबुडकर यांनी दिली. नववर्षाच्या सुरुवातीलाच राबविलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यासोबतच स्वच्छ व सुंदर समुद्र किनाऱ्यांचा संदेश जिल्हाभर पोहोचल्याचे चित्र दिसून आले.
----------------
(ग्राफ - 15121)
किनाऱ्यावरील स्वच्छतेवर एक नजर
तालुका*समुद्र किनारे*संकलित कचरा
देवगड*१३*५००
मालवण*९*९२३
वेंगुर्ले*११*३५६