राज्य धनुर्विद्या स्पर्धेसाठी
पाच विद्यार्थ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २ : रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यसंघात निवड झाली.
महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशन आणि सोलापूर जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित १७वी मिनी सबज्युनियर व २री कीड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा लवकरच होणार आहे. या राज्यस्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी काल (ता. १) जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन केले होते. ही स्पर्धा १०, १३ व १५ वयोगटातील मुले व मुली यांच्यात खेळवण्यात आली. ही स्पर्धा कम्पाउंड, रिकर्व्ह आणि इंडियन या प्रकारात घेतली होती. यामधून जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला आहे. कडवई पंचक्रोशी शिक्षणसंस्थेच्या पाच खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या पाचही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे. त्यात साइराज सुर्वे, स्वराज चव्हाण, आर्या जोयशी, स्वरा इंजले व परिणीती कांबळे यांचा समावेश आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत यलगुडकर, सचिव वसंत उजगावकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे यांनी अभिनंदन केले. त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक संतोष साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.