ओतूर, ता. २ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय, सिताबाई तांबे ज्युनिअर कॉलेज, प्रतिभाताई पवार प्रशाला यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बी. जी. शेख यांनी दिली.
यात गुरूवारी (ता. १) जानेवारी रोजी अपूर्व विज्ञान मेळावा, रांगोळी प्रदर्शन, भित्तीचित्र स्पर्धा व विज्ञान रांगोळी प्रदर्शन आयोजित केले होते.
अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन सरपंच छाया तांबे, रांगोळी प्रदर्शन उद्घाटन प्रांजल भाटे, भित्तीचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उपसरपंच प्रशांत डुंबरे, विज्ञान रांगोळी प्रदर्शन उद्घाटन शब्बीर तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पालक उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी विज्ञान प्रकल्पांची पाहणी केली. रांगोळ्यांचे कौतुक केले. अपूर्व विज्ञान मेळाव्यात एकूण ६५ प्रकल्प सादर करण्यात आले, भित्तीचित्र स्पर्धेत १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, रांगोळी स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच विज्ञान रांगोळीमध्ये ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
बुधवारी (ता. ३१) डिसेंबर रोजी स्काऊट गाइड अंतर्गत विद्यालयात आनंद मेळावा भरविण्यात आला. आनंद मेळाव्याचे उद्घाटन बाळासाहेब डुंबरे व मुक्ताई महिला ज्येष्ठ नागरिक संघ यांनी केले. तसेच यावेळी माजी विस्तार अधिकारी सुनंदा डुंबरे व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका नीलम तांबे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
या आनंद मेळाव्यात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. तसेच शाळेत नुकताच क्रीडा महोत्सव आयोजित केला होता. याचे उद्घाटन उद्योजक राहुल तांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी. टी. साळवे व आर. के. वाकचौरे, प्राचार्य बी. जी. शेख, सुरेख गोरडे, किसन आरोटे, नाजनीन मोमीन, आर. बी. डुंबरे, प्रवीण नायकवाडी, संभाजीराव शिंदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रामदास डुंबरे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य बशीर शेख यांनी केले. तर आभार राहुल पिंगट यांनी मानले.