डॉ. संजय जानवळे (सल्लागार)
आरोग्याचे ‘बाळ’कडू
लहान मुलांना होणारे आजार आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्या अनेक आहेत. आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत पालकांची जागरुकता, लसीकरण, स्वच्छ पिण्याचे पाणी, वैयक्तिक व परिसर स्वच्छता, योग्य आहार आणि मुलं आजारी पडू नयेत म्हणून केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अमंलबजावणीमुळे एकीकडे संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात आता काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे बिघडलेल्या आधुनिक जीवनशैलीचा परिणाम म्हणून मुलांत दीर्घकालीन (क्रोनिक) आजारांच्या आणि मानसिक आजारांच्या प्रमाणातही वाढ होताना दिसून येत आहे.
मुलांत सर्दी- खोकला, घसादुखी, कान फुटणे, मूत्रमार्गाचा संसर्ग अशा प्रकारच्या आजारांची परिस्थिती आहे तशीच आहे. लठ्ठपणा, एडीएचडी (अतिचंचलता व एकाग्रतेचा अभाव), बालदमा, चिंता/ औदासिन्य यासारख्या मानसिक आजारांच्या, झोपेच्या, अपघाताच्या, लवकर वयात येण्याच्या समस्यांचे वाढते प्रमाण पालंकासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
पूर्वी मुलांत अतिसाराचे आणि त्यामुळे होणारे कुपोषणाचे प्रमाण जास्त होते. अलीकडे मुलांत बद्धकोष्ठता होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
वातावरण बदलत आहे. हवेच्या प्रदूषणाचा अनिष्ट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम प्रदूषणावर होतो आणि प्रदूषणाचा परिणाम श्वसनसंस्थेवर होत आहे. प्रदूषणामुळे केवळ शारीरिक आरोग्यच नाही, तर मानसिक आरोग्यदेखील बिघडत आहे. मुलांमध्ये कमी बुद्ध्यांक पातळी, स्मरणशक्ती गडबड आणि अटेंशन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसॉर्डर विकसित होण्याची शक्यता असते.
‘काहीही करा, मुलाचा खोकला जात नाही’, असा पालकांचा सूर असतो. अलीकडे नेहमी खोकला येण्याचे आणि खोकला लांबण्याचे प्रमाण प्रचंड आहे. व्हायरल इन्फेक्शन, ॲलर्जी, बदलत्या वातावरणाला मुलाने दिलेला असाधारण प्रतिसाद, ही काही त्याची कारणे! रेस्टाॅरंटचा धूर, डिझेलच्या वाहनातून बाहेर पडणारा धूर, बांधकामामुळे (कन्स्ट्रक्शन) होणारा धुरळा, झाडाफुलांवरचे परागकण हे काही बाह्य वातावरणात खोकल्यासाठी कारणीभूत ठरणारे ट्रिगर्स आहेत. तीनचाकी रिक्षांतून जेव्हा मुलं शाळेत जातात, डिझेलच्या वाहनांतील धूर थेट मुलांच्या नाकावर जातो.
मुले रात्री घोरतात, त्यांना नाकाने श्वास घेणे दुरापास्त होते आणि ती मुले रात्री तोंड उघडे ठेवून श्वास घ्यायला लागतात. त्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होतो. त्यांच्या नाकातील ॲडीनाॅईड सुजलेले असतात.
रात्री नीट झोप झाली नाही, तर मेदूंचे कार्य बिघडते. दिवसा थकवा जाणवतो किंवा झोप येते. त्यामुळे चिंता, नैराश्य आणि मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यांचा शाळेतला परफाॅर्मन्स ढासळतो. अशा मुलांत अतिचंचलता वाढते. वेळीच उपचार केले नाहीत, तर स्लीप ॲप्निया (झोपेत श्वास बंद पडणे) धोका असतो. ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया’, या आजारात श्वसनमार्ग अरुंद झाल्याचा परिणाम श्वासोच्छ्वासावर होतो, रक्तातील ऑक्सिजनची पातळी खालावते.
मुलांत लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. बालपणापासून असलेल्या आहाराच्या सवयी लठ्ठपणाला जबाबदार आहेत. अयोग्य आहार, आहारात साखरेचे अधिक्य, कमी फायबर, उच्च कॅलरी आणी प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा मर्यादेहून अधिक समावेश असणे ही लठ्ठपणाची काही कारणे. त्यामुळे उच्च रक्तदाब होण्याचा व अशक्तपणा (fatigue) येण्याचा धोका अधिक असतो. थकव्याचा परिणाम मुलाच्या एकाग्रतेवर होतो. पाच ते बारा या वयोगटातील मुले ॲक्टिव्ह, धडपडी असतात. मैदानावर खेळताना, बाईक चालवताना पडतात, त्यामुळे जखमा किंवा फ्रॅक्चर होते. अंगावर गरम पाणी, भाजी पडल्याने भाजतात. हौदात, विहिरीच्या पाण्यात पडल्याने त्यांच्या जीवावर बेतते. या वयात औषधी, स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे डिटर्जंट यांचे सेवन केल्याने होणाऱ्या विषबाधेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या वयात पालंकाना जागरुक राहत त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल अन् सजगता बाळगावी लागेल.