चिंचपाडा रस्त्यावर अखेर गतिरोधक
सुसाट वाहनांना ब्रेक; नागरिकांना दिलासा
कल्याण, ता. ५ (बातमीदार) : काटेमानिवली ते चिंचपाडा या पूर्वेकडील रस्त्यावर अखेर गतिरोधक तयार केले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिन्याभरापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. खड्डेमुक्त रस्त्यामुळे प्रवास तर सोयीचा झाला; मात्र वाहतूक सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. शाळा-महाविद्यालयांच्या गर्दीचा हा परिसर असल्याने भरधाव वाहनचालक पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत होते. अखेर नागरिकांच्या मागणीनंतर पालिकेच्या वतीने गतिरोधक बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
काटेमानिवलीला जोडणारा चिंचपाडा रोड हा कल्याण पूर्वेचा प्रमुख दुवा असून या रस्त्यावरील लोकवस्ती चिंचपाडा, उल्हासनगर, आशेळे, माणेरे गावामार्गे अंबरनाथपर्यंत पसरली आहे. इतक्या मोठ्या वाहतुकीचा मार्ग असूनही या परिसराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली होती. यापूर्वी असलेले काही गतिरोधक रस्त्याच्या दुरुस्तीनंतर समतल झाले होते, त्यामुळे रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. नव्याने बसविण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे मात्र आता पादचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळत आहे.
रिक्षाचालकांवर अंकुश ठेवण्याची मागणी
या मार्गावरून धावणाऱ्या काही रिक्षा अनधिकृत असल्याचेही वारंवार नागरिकांकडून सांगितले जाते. काही रिक्षाचालक नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवत असल्याने अपघाताच्या घटना घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने नियमित तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी मात्र कायम आहे.