रिल्स बनविण्याचे वाहतूक पोलिसांकडून आवाहन
‘रिल्स बनवा...बक्षिस मिळवा’
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धाचे आयोजन
ठाणे शहर, ता. ५ (बातमीदार) ः विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अभ्यासासोबतच वाहतूक नियमांचेही ज्ञान व्हावे याकरिता ठाणे वाहतूक विभागाने पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांकरिता क्रिएटीव्ह रील्स बनवा आणि बक्षीस मिळवा, ही वाहतूक सुरक्षा रील्स बनवण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार, सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा अभियानाचे नियोजन केले आहे. रिल्स मेकिंग हा युवावर्गाचा आवडता छंद आहे. त्या अनुषंगाने ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरीता ‘रिल्स बनवा...बक्षिस मिळवा’ ही अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. ‘आजचे हेल्मेट उद्याचे जीवन’, ‘सीट बेल्ट सेफ्टी बेल्ट’, ‘मद्यपान करून वाहन चालवू नका’, ‘कुणीतरी तुमची वाट पाहत आहे’, ‘मोबाईल आहे, आयुष्य नाही’, ‘सिग्नल पाळा, शॉर्टकट नको’, असे स्पर्धेचे विषय आहेत.
स्पर्धेतील नियम :
वाहतुकीचे नियम, सुरक्षित ड्रायव्हिंग, पादचारी सुरक्षा यावर भर देऊन एक ते दीड मिनिटांची रिल्स बनवणे अपेक्षित असून लाल, पिवळा आणि हिरवा या ट्रॅफीक सिग्नलच्या रंगाची थीम यात असावी. तसेच, रिल्समध्ये रस्ते, शहर आणि सिग्नल जंक्शनची पार्श्वभूमी असावी.
येथे पाठवा रिल्स :
५ ते १० जानेवारीपर्यंत अधिकृत इंस्टाग्राम पेजवर रिल्स अपलोड कराव्यात. त्यामध्ये स्वतःचे पूर्ण नाव, महाविद्यालयाचे नाव आणि संपर्क क्रमांक टाकावा. सर्व प्रोफाइल सार्वजनिक असणे आवश्यक असून उत्कृष्ट रिल्स बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
तरुणाईत रिल्सची क्रेझ आहे. परंतु, त्यासाठी त्यांच्याकडून अनेक धोके पत्करले जातात. मात्र, त्यांच्या हातून रिल्स स्पर्धेमधून समाजोपयोगी विषय हाताळण्यात यावेत हाच उद्देश आहे. कुणीही जीव धोक्यात घालून रिल्स बनवू नका. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच स्पर्धेत सहभाग घ्यावा.
- पंकज शिरसाट, उप आयुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा