हरीवल्लभ संगीत महोत्सवात
मोरघरच्या अजयची साथसंगत
आनेवाडी, ता. ५ : भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून जालंधर (पंजाब) आयोजित केलेल्या नामांकित हरिवल्लभ संगीत महोत्सवात जावळी तालुक्यातील मोरघर गावचे सुपुत्र अजय दत्तात्रय गायकवाड यांना तबला साथसंगत करण्याची संधी मिळाली.
या महोत्सवाला गौरवशाली परंपरा असून, या मंचावर उस्ताद झाकिर हुसेन, पंडित किशन महाराज, पंडित जसराज यासारख्या दिग्गज कलाकारांनी पूर्वी आपल्या कलेचा आविष्कार सादर केला आहे. महोत्सवाच्या १५० व्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य पंडित शैलेश भागवत गायकवाड यांनी तबल्यावर प्रभावी साथसंगत केली. यावेळी पंडित शैलेश भागवत यांनी विलंबित एकताल व विलंबित झपताल सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमास पंडित सजन मिश्र, पंडित विजय घाटे, विदुषी अश्विनी भिडे यांसारख्या नामवंत कलाकार उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने अजय गायकवाड यांच्या तबला वादनाने रसिकांची विशेष दाद मिळविली. अजय यांना आजोबा, प्रसिद्ध भजन गायक व्यंकट गायकवाड यांच्याकडून संगीताचा वारसा लाभला आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्यांचा संगीत प्रवास सुरू आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार ही पदवी त्यांनी संपादन केली आहे. या यशाचे श्रेय अजय यांनी गुरू पंडित रूपक पवार, जितेंद्र भोसले व डॉ. पंडित प्रमोद गायकवाड यांना दिले.
B02315
जालंधर (पंजाब) ः पंडित शैलेश भागवत यांच्यासोबत तबला वादन करताना अजय गायकवाड.
.....................................