Bangladesh Cricket: बांगलादेशी खेळाडू आता भारतीय बॅटचा वापर करू शकणार नाहीत, कारण…
Tv9 Marathi January 07, 2026 08:45 PM

भारत आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डातील संबंध आता कमालीचे ताणले गेले आहेत. बांगलादेशातील हिंसाचारानंतर भारतात त्याचे पडसाद उमटले आहेत. त्याचाच भाग म्हणून बीसीसीआयने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्ताफिझुर रहमान याची आयपीएलमधून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे भेदरलेल्या बांगलादेशने कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. भारतात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. यासाठी आयसीसीकडे प्रस्तावही पाठवला. बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत व्हावे अशी मागणी केली होती. पण आयसीसीने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. रिपोर्टनुसार, आयसीसीने बांगलादेशला स्पष्ट सांगितलं की सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसारच खेळावे लागतील. म्हणजेच बांगलादेशला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचे सर्व सामने भारतातच खेळावे लागतील. बांगलादेशचे सामने मुंबई आणि कोलकात्यात होणार आहेत. असं असताना बांगलादेशी फलंदाज यापुढे भारतीय बॅट उत्पादक कंपनी एसजीने बनवलेले बॅट वापरू शकणार नाहीत.

रिपोर्टनुसार, एसजीने सध्याची स्थिती पाहता बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबत असलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशी बॅटवर पूर्वी प्रायोजक म्हणून एसजी कंपनीचे स्टिकर होते. आता हा करार रद्द केल्याने प्रायोजकत्वाचे फायदे मिळणार नाहीत. यात कस्टम-मेड बॅट्स आणि ब्रँडिंगमधून व्यावसायिक परतावा यांचा समावेश होता. बांगलादेशचा टी20 संघाचा कर्णधार लिट्टन दास देखील एसजी कंपनीची बॅट वापरतो. माहितीनुसार, एसजीने बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबत असलेला किट स्पॉन्सरचा करार रद्द केला आहे. भारतीय कंपनीने बांगलादेशी खेळाडूंसोबत असलेला आपला करार पुढे वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बांगलादेशला आता नव्या कीट स्पॉन्सरचा शोध घ्यावा लागणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने मुस्तफिझुर रहमानला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बांग्लादेश क्रीडा मंत्रालयाच्या सूचनांनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला ईमेल पाठवून भारताने 2026च्या टी20 विश्वचषक सामन्यांसाठी ठिकाण बदलावे अशी मागणी केली. दरम्यान, बांगलादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण बंदी घालण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. बांगलादेशने सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या भारत बांग्लादेश स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. पण बीसीसीआयने हे वेळापत्रक धुडकावून लावलं आहे. त्यामुळे भारत बांग्लादेश ही मालिका होणार नाही. आता पुढे काय होतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.