Devendra Fadnavis: अजितदादांनी धोका दिला? शरद पवारांना सोबत घेणार का? फडणवीसांच्या उत्तरानं राजकीय भूकंप?
Tv9 Marathi January 07, 2026 08:45 PM

Devendra Fadnavis on Sharad Pawar: 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यानं ऐन महापालिका निवडणुकीत पुन्हा टुणकन उडी घेतली आहे. आरोप असून सुद्धा आपण आरोप करणाऱ्यांसोबतच सत्तेत वाटेकरी असल्याचे अजितदादा म्हणाले आणि वादाला तोंड फुटले. अजितदादांच्या वक्तव्यामुळे भाजप चांगलीच अडचणीत आली आहे. भाजप गोटातून अजितदादांना इशारा, दमबाजी सर्व प्रयोग सुरू आहे. पण वादावर अजून पडदा पडलेला नाही. दरम्यान या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा बॉम्ब टाकला आहे. त्यांनी अजितदादांना सोबत घेण्याविषयीचे कारण स्पष्ट करतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोबत घेण्याविषयी मोठे भाष्य केले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याविषयी सु्द्धा मुख्यमंत्र्यांच्या मनातील हळवा कोपरा सार्वजनिक झाला आहे.

सिंचन घोटाळ्याबाबत मोठे वक्तव्य

राज्यात सध्या सिंचन घोटाळ्याने पुन्हा एकदा डोके वर काढलं आहे. अजितदादांवर भाजपनं 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. तेच अजितदादा महायुतीत भाजपसोबत आहेत आणि हेच सत्य अजितदादांनी सांगितलं. त्यावरून राजकीय वाद पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आता हा अजितदादांना इशारा आहे की मुख्यमंत्र्यांनी वस्तूस्थितीची जाणीव करून दिली, याची चर्चा सुरू आहे. या सिंचन घोटाळ्यात आजही 15 दोषारोपपत्र दाखल असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली. अनेक लोकांवर सदोष गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील काही प्रकरणं तर आता अंतिम टप्प्यात आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. पण महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही विकासावर फोकस केल्याने आणि त्यावरून दूर जायचं नसल्याने आपण त्याविषयीच्या प्रश्नानं उत्तर देणं टाळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नाहीतर माझी उत्तरं कशी असतात हे सर्वांना माहिती आहे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

2019 मध्ये शरद पवारांनी शब्द फिरवला

दरम्यान या मुलाखतीत 2019 मधील भल्या पहाटेचा शपथविधीविषयी फडणवीसांनी मन मोकळं केलं. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा भल्या पहाटेचा शपथविधी हा औटघटिकेचा ठरला होता. राष्ट्रवादी लागलीच या नवीन प्रयोगातून बाजूला झाली होती. पण मुख्यमंत्र्यांनुसार अजित पवारांना शरद पवार यांनीच पाठवले होते. अजित पवार मोहोरे होते. चाल मात्र शरद पवारांची होती. त्यांच्या संमतीने हे सरकार अस्तित्वात आले होते असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पण नंतर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यास संमती दिल्यानं शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचा शब्द फिरवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवार यांना शरद पवार यांनी असे तीनदा तोंडावर पाडल्याचा आरोपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीत बंड करण्याचे कारण समोर आणलं. अजितदादांचा त्यावेळी कोणताही भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर वेळेनुसार राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळेच अजित पवार हे महायुतीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर अजित पवार हे ट्रोजन हॉर्स नव्हते असा खुलासाही फडणवीस यांनी केला.

शरद पवारांना सोबत घेणार का?

शरद पवार हे भाजपसोबत येतील का,राजकारणात केव्हा काहीही घडू शकतं, त्यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी त्याला एकदम चपखल उत्तर दिलं. राजकारणात आता पुलाखाली इतकं पाणी वाहून गेलं आहे की, मला असं वाटतं की, never Say never, राजकारणात काहीही होऊ शकतं.काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष सोबत येण्याचे सोडून, त्यांची युती, आघाडी होऊ शकत नाही. मी पूर्वी ठामपणे म्हणायचो की जग इकडचं तिकडे होईल पण भाजप राष्ट्रवादीसोबत जाणार नाही.पण परिस्थिती अशी आली की आम्हाला भाजपसोबत जावं लागलं.त्यामुळे राजकारणात वेळेनुसार काही तरी घडामोड घडतेच.सध्या आमचं सरकार स्थिर आहे. मजबूत आहे. त्यामुळे शरद पवार यांचा गट सोबत घेण्याची तशी गरज नाही. पण राजकारणात आजकाल मी नेव्हर से नेव्हर असं म्हणतो असे मोठे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

उद्धव ठाकरें सोबत एक कप चहा

तर मीठी घोटाळा आणि मुंबईतील इतर घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. याप्रकरणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नैतिक जबाबदारी घ्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या धोरणाला आपलाविरोध होता. पण ते काही आमचे शत्रू नाहीत. राजकीय विरोधक हा काही दुश्मन नसतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चहा पिण्यास मला काहीच अडचण नसल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांची धोरणं आणि भ्रष्टाचाराला माझा विरोध आहे, व्यक्ती म्हणून विरोध नसल्याचेमुख्यमंत्री म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.