राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. महापालिका निवडणुकीत युती आघाड्यांची नवी समीकरणंही दिसून येत आहेत. दरम्यान, प्रचारासाठी मुंबईत मैदानांसाठी चढाओढ होताना दिसतेय. जनतेचे प्रश्न सोडवू असं सांगणाऱ्या नेत्यांची आणि पक्षांची आता प्रचारासाठी मैदान मिळवताना दमछाक होत आहे. महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर १३ तारखेला प्रचाराची सांगता होणार आहे.
मुंबईत शेवटच्या टप्प्यात शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी भाजप-शिंदे सेना आणि ठाकरे बंधू यांनीही अर्ज केलेत. महापालिकेकडं यासंदर्भात अर्ज केले असून ते नगरविकास खात्याकडं पाठवण्यात आले आहेत.
अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती, कमळाला हाताचा आधार; शिवसेना शिंदे गट विरोधी बाकावरशिवाजी पार्क मैदान प्रचारासाठी मिळावे यासाठी ठाकरे बंधूंनी ११,१२,१३ जानेवारी या तारखांची मागणी केलीय. तसंच भाजप शिंदे सेनेकडूनही याच तारखांना मैदान मिळावं अशी मागणी करण्यात आलीय. ११ जानेवारीला रविवार असून तो प्रचारासाठी शेवटचा रविवार ठरणार आहे. तर १३ जानेवारीला प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यनं या दोन दिवशी मैदान कुणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
एमएमआरडीएच्या बीकेसी मैदानावरही राजकीय पक्ष सभा घेण्याची तयारी करत आहेत. यासाठीही अर्ज करण्यात आले आहेत. पण कुणी अर्ज केलेत याबाबत आचारसंहितेचं कारण सांगत माहिती देण्यास अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात आलाय.