एशेज कसोटी मालिकेत इंग्लंडची लाज गेली आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने गमवावा लागला आहे. त्यामुळे इंग्लंडची संपूर्ण जगात नाचक्की झाली आहे. असं असताना आणखी एका स्टार खेळाडूच्या वर्तनामुळे मान खाली घालावी लागत आहे. हॅरी ब्रूकने एका बारमध्ये मारहाण केल्याची घटना घडली आहे. बाउंसरला मारहाण केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. एशेज कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यावेळी हॅरी ब्रूकचा न्यूझीलंडमध्ये एका बाउंसरशी वाद झाला होता. ही घटना न्यूझीलंड दौऱ्यातील शेवटच्या सामन्याच्या काही तासाआधी घडली होती. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, वेलिंगटनमध्ये तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी ब्रूकला नाइट क्लबमध्ये जाऊ दिलं नाही. तेव्हा त्याने खूप दारू प्यायली होती. त्यानंतर त्याचं बाउंसरशी वाद झाला. आश्चर्य म्हणजे या घटनेची माहिती स्वत: हॅरी ब्रूकने संघाला दिली आणि त्यात आता दोषी आढळला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हॅरी ब्रूक सखोल चौकशी केली आणि त्यात दोषी आढळला आहे. या प्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 30 हजार पौंड म्हणजेच 36 लाखांचा दंड ठोठावला आहे. पण असं असलं तरी वनडे आणि टी20 संघाचं कर्णधारपद कायम ठेवलं आहे. ब्रूकला केलेल्या प्रकाराचा पश्चाताप झाला असून त्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाची माफी देखील मागितली आहे. त्याने माफीनामा देताना सांगितलं की, ‘इंग्लंडसाठी खेळणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी हे गंभीररित्या पाहात आहे. माझ्या सहकाऱ्यांना, प्रशिक्षक आणि समर्थकांना निराश केल्याने मला त्याचं वाईट वाटत आहे. मी माझ्या कृत्याबद्दल माफी मागतो. माझे वागणं चुकीचे होते आणि इंग्लंड संघाला याचा फटका बसला, म्हणून मी मनापासून माफी मागतो. यापुढे असं कधीच घडणार नाही याची काळजी घेईन.’
हॅरी ब्रूकच नाही तर इंग्लंडच्या इतर खेळाडूंनीही अशा लाजिरवाण्या घडामोडींनी लक्ष वेधून घेतलं आहे. एशेज कसोटी मालिकेदरम्यान बेन डकेटने क्षमतेपेक्षा मद्य प्राशन केलं होतं. रिपोर्टनुसार, काही खेळाडू संपूर्ण दौऱ्यात क्षमतेपेक्षा जास्त मद्य प्राशन करत होते. नूसातील बेन डकेटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात दारूच्या नशेत घरी जाण्याच्या स्थितीत नव्हता. इंग्लंडच्या इतर खेळाडूंनीही मैदानाबाहेर केलेल्या अशा कृत्यांनी क्रिकेट बोर्डाची मान खाली घातली आहे. खेळाडूंच्या या कृतीचा फटका मैदानाबाहेर आणि मैदानातही बसताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 0-3ने आणि आता एशेज मालिका 1-4 ने गमावली आहे.