VHT : टीममधून वगळल्याचा संताप, ऋतुराजचा वादळी शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, निवड समितीला सडेतोड उत्तर
GH News January 08, 2026 07:12 PM

पुणेकर ऋतुराज गायकवाड याने काही आठवड्यांआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शतक ठोकलं होतं. ऋतुराजने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक करत क्रिकेट चाहत्यांचं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं होतं. ऋतुराजने दुखापतग्रस्त उपकर्णधार श्रेयस अय्यर याच्या जागी मिळालेल्या संधीचा फायदा घेत आगामी न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेसाठी आपला दावा ठोकला होता. मात्र ऋतुराजला निवड समितीने डच्चू दिला. श्रेयसच्या कमबॅकमुळे ऋतुराजला वगळण्यात आलं. मात्र शतक करुनही ऋतुराजला वगळण्यात आल्याने आजी माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र ऋतुराजने भारतीय संघातून वगळल्यानंतरही धमाका कायम ठेवला आहे.

ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करताना गोवा विरुद्ध खणखणीत शतकी खेळी केली. ऋतुराजने या खेळीसह पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम याचा वर्ल्ड रेकॉर्डही ब्रेक केला आहे. महाराष्ट्रची 5 आऊट 52 अशी स्थिती झाली होती. मात्र ऋतुराज महाराष्ट्रसाठी संकटमोचक ठरला. ऋतुराजने 8 चौकार आणि 6 षटकारांसह एकूण 131 चेंडूत नाबाद 134 धावा ठोकल्या. ऋतुराजच्या लिस्ट ए कारकीर्दीतील हे 20 शतक ठरलं. तसेच ऋतुराजने लिस्ट ए कारकीर्दीत 19 अर्धशतकं झळकावली आहेत.

ऋतुराजची गेल्या 4 सामन्यांमधील 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही तिसरी वेळ ठरली. ऋतुराजने याआधीच्या 3 डावांत अनुक्रमे 124, 66 आणि 22 धावा केल्या होत्या. तसेच ऋतुराजने या खेळीसह लिस्ट ए क्रिकेटमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या.

बाबर आझमचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

ऋतुराजने या शतकी तडाख्यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेगवान 5 हजार धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम पाकिस्तानी बाबर आझम याच्या नावावर होता. बाबरने 97 डावांत 5 हजार धावा केल्या होत्या. मात्र ऋतुराजने बाबरच्या तुलनेत 2 डावांआधी ही कामगिरी करुन दाखवली. ऋतुराजने 95 डावांत 5 हजार धावांपार मजल मारली.

महाराष्ट्रची गोवा विरूद्धच्या सामन्यात 6 आऊट 52 अशी स्थिती झाली होती. मात्र ऋतुराजने एक बाजू लावून धरली. ऋतुराजने कर्णधार आणि फलंदाज म्हणून यशस्वीरित्या दुहेरी भूमिका पार पाडली. ऋतुराजच्या या खेळीच्या जोरावर 50 षटकांत महाराष्ट्रने 7 विकेट्स गमावून 249 धावा केल्या.

महाराष्ट्र गोव्याला रोखणार का?

ऋतुराज गायकवाड याच्याव्यतिरिक्त विकी ओस्तवाल आणि राजवर्धन हंगरगेरकर या शेवटच्या 2 फलंदाजांनी निर्णायक योगदान दिलं. विकीने अर्धशतक झळकावलं. विकीने 53 धावांचं योगदान दिलं. तर राजवर्धनने 32 धावा जोडल्या. आता महाराष्ट्रचे गोलंदाज 250 धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरणार की नाही? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.