AUS vs ENG: सिडनी कसोटी सामना संपताच मैदानात चाहत्यांनी घेतली धाव, नेमकं काय घडलं ते जाणून घ्या
GH News January 08, 2026 07:12 PM

एशेज कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने 4-1 ने जिंकली. पाचवा कसोटी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका विजयासह शेवटही गोड केला. सिडनी कसोटी सामना पाच दिवसापर्यंत चालला. त्यामुळे विजयाचं वजन कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता होती. पण ऑस्ट्रेलियाने शेवटच्या दिवशी पाच गडी गमवून हा सामना जिंकला. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला तो ट्रेव्हिस हेड… तर मालिकावीराचा पुरस्कार मिचेल स्टार्क याला मिळाला. मिचेल स्टार्कने या मालिकेत एकूण 31 विकेट घेतल्या होत्या. एशेज कसोटी मालिका जिंकल्यानंतर एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. कारण या विजयानंतर सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये चाहत्यांनी धाव घेतली. त्याला कारणंही तसंच होतं. सिडनी कसोटी सामना संपल्यानंतर एससीजी व्यवस्थापकांनी स्टँड्समध्ये चाहत्यांना मैदानात येणाचं आमंत्रण दिलं. हजारो चाहत्यांना पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी मैदानात बोलवलं गेलं.

सामन्यानंतर चाहत्यांना मैदानात बोलवण्याची ही घटना अद्भूत होती. गेल्या अनेक वर्षात ही पहिलीच घटना आहे की चाहत्यांना मैदानात येण्याचं आमंत्रण दिलं गेलं. यामुळे चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण आपल्या आवडत्या खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी मिळाली. सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या या निर्णयाचा जगभरातील चाहते कौतुक करत आहेत. पण भारतात पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी बोलवणं शक्य आहे का? असा प्रश्न आता अनेकजण विचारत आहेत. कारण यापूर्वी भारतात असंच कधीच घडलं नाही. तसेच भविष्यात असं काही होईल असं वाटत नाही. कारण भारत हा क्रिकेट वेडा देश आहे. आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी काहीही करू शकतात. भारतीय क्रिकेटर जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातात. तेव्हा त्यांना सुरक्षा पुरवणं आणि चाहत्यांच्या गराड्यातून बाहेर काढणं कठीण होतं.

भारताने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जिंकल्यानंतर मुंबईत अभूतपूर्व गर्दी जमा झाली होती. या गर्दीतून भारतीय खेळाडूंची बस बाहेर काढणं कठीण झालं होतं. इतकंच काय तर आरसीबीने 18 वर्षांनी आयपीएल जेतेपद मिळवलं. या जेतेपदाचा उत्साह इतका होता की विजयोत्सव पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि अनेकांना जीव गमवावा लागला. काल परवा विराट कोहली वडोदऱ्याला गेला तेव्हा एअरपोर्टवर त्याला चाहत्यांनी गराडा घातला होता. यावेळी त्याला गाडीकडे जाण्यासाठी कसरत करावी लागली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.