घाटकोपरमधील उद्यान बनले मद्यपींचा अड्डा
दारूच्या बाटल्यांचा खच; नागरिकांची कारवाईची मागणी
घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिमेतील संघर्षनगर परिसरात असलेले महापालिकेचे कै. आनंदीबाई सुर्वे उद्यान सध्या मद्यपींचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी येथे मद्यपींचा वावर असतो. त्यामुळे सुमारे साडेसहा एकर क्षेत्रफळाच्या या विस्तीर्ण उद्यानात दारू पिण्यास मनाई करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.
महापालिकेच्या ‘एल’ विभागाच्या वतीने या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, फुटबॉल मैदान, व्यायामाची साधने, बसण्यासाठीचे बाक, विस्तृत हिरवळ तसेच मियावाकी पद्धतीसह विविध शोभेची झाडे लावली आहेत. सकाळच्या वेळेस उद्यानात फेरफटका मारल्यास अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, कागदी डिश, चणे, शेंगदाणे आणि इतर खाद्यपदार्थांचा कचरा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. दररोज एक गोणी भरेल एवढ्या प्रमाणात हा कचरा जमा होत असून, रविवारी व सुट्टीच्या दिवशी त्यात अधिक भर पडते. त्यामुळे हे उद्यान लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे की मद्यपींसाठी, असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
उद्यानाला दोन प्रशस्त प्रवेशद्वारे असली तरी इतर काही ठिकाणांहून आत प्रवेश करण्यासाठी मोकळी जागा आहे. या उद्यानात रात्री उशिरापर्यंत मद्यपींचा वावर असतो.
उद्यान हे नागरिकांसाठी आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक या उद्यानात येतात. मात्र रात्रीच्या वेळी दारू पिण्यासाठी या उद्यानाचा वापर केला जातो. सकाळी येथे फेरफटका मारल्यास दारूच्या अनेक बाटल्या पडलेल्या दिसतात. हे सर्व थांबायला हवे. संबंधित महापालिका प्रशासन व पोलिस विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे. तसेच उद्यानात सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा.
- योगेश मौर्य, अध्यक्ष, आई-बाबा फाउंडेशन
संवेदनशील भागात दररोज पोलिसांची गस्त सुरू असते. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जाते. संबंधित उद्यान परिसरात दररोज गस्त घातली जाईल.
- सुनील यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, साकीनाका पोलिस स्थानक
फोटो - 792, 793