टीम इंडियाने 2025 वर्ष गाजवलं. टीम इंडियाने 2025 वर्षातील शेवटच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. भारताने यासह 2025 चा गोड शेवट केला. त्यानंतर आता टीम इंडिया 2026 या वर्षात पहिली आंतरराष्ट्रीय मालिका मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंड भारत दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात 3 वनडे आणि 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. एकदिवसीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय चाहत्यांचं रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीच्या कमबॅककडे लक्ष असणार आहे. या पहिल्या सामन्यानिमित्ताने भारताची पहिल्या सामन्यासाठी संभाव्य प्लइंग ईलेव्हन कशी असणार? हे जाणून घेऊयात.
कर्णधार-उपकर्णधाराचं कमबॅक निश्चित!न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून भारतीय संघात कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या दोघांचं प्लेइंग ईलेव्हनध्ये कमबॅक होणार असल्याचं निश्चित आहे. दोघांना दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकावं लागलं होतं. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झालेली. तर शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतीने घेरलं होतं.
शुबमन-श्रेयसच्या कमबॅकमुळे टॉप 4 चं गणित सोपं झालंय. रोहित आणि शुबमन ही जोडी ओपनिंग करेल. विराट कोहली याच्यावर नेहमीप्रमाणे तिसऱ्या स्थानी खेळण्याची जबाबदारी असेल. तर श्रेयस चौथ्या स्थानी खेळण्यासाठी सज्ज आहे.
विकेटकीपर ऋषभचा पत्ता कट!टीम मॅनेजमेंटडून गेल्या काही सामन्यांपासून विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत ऐवजी केएल राहुल याला संधी दिली जात आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धही केएललाच संधी मिळाल्यास पंतला पुन्हा एकदा बाहेर बसावं लागेल. केएलला संधी मिळाल्यास तो पाचव्या स्थानी खेळेल. हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत ऑलराउंडर रवींद्र जडेजा त्याची जागा घेऊ शकतो. तसेच नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.
मियाँ मॅजिक परतणार?वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सिराजला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आता सिराजला अर्शदीप सिंह आणि प्रसिध कृष्णा या दोघांपैकी कुणाची साथ मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच कुलदीप यादव याच्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.