ठाण्यात ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार!
सोमवारी मूस चौकात उद्धव-राज यांची संयुक्त सभा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या वेगळे असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. सोमवारी (ता. १२) ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील मूस चौकात ही ऐतिहासिक संयुक्त सभा पार पडणार आहे. या सभेमुळे ठाण्यातीलच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
दोन दशकांनंतर ठाकरे घराण्यातील ही ‘एकी’ ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. ही केवळ एक प्रचारसभा नसून, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप विरुद्ध उभे केलेले मोठे आव्हान मानले जात आहे. ठाणे हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असला तरी, बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे ठरू शकते.
मुंबई-ठाण्यातील मराठी मतदारांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही नेते ‘मराठी अस्मिते’ची साद घालण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर विखुरलेल्या जुन्या शिवसैनिकांना पुन्हा एकत्र आणण्याचे मोठे आव्हान ठाकरे बंधूंसमोर असेल. महापालिकेतील कारभार, स्थानिक प्रश्न आणि भाजपच्या वाढत्या ताकदीवर ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे.
राजकीय वर्तुळात उत्सुकता
सोमवारी होणाऱ्या या सभेसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मूस चौकात होणारी ही गर्दी ठाण्याच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिणार का? आणि या सभेचा मतदानावर नेमका काय परिणाम होणार? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.