सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते
मुंबईतील प्रचारात सक्रिय
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १० : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय नेते प्रचारात उतरले आहेत. शिंदे शिवसेना, भाजपसह ठाकरे शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते प्रचारात सक्रिय आहेत.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. शिंदे शिवसेना, भाजप, ठाकरे शिवसेना, मनसे यांनी प्रचारात ताकद लावायला सुरुवात केली आहे. या प्रचारात तसेच निवडणूक रिंगणात सिंधुदुर्गातील अनेक चाकरमानी उतरले आहेत. याच्याच जोडीने जिल्ह्यातील बडे नेते प्रचारात सक्रिय आहेत. या निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गितेश हेही उतरले आहेत. तेथील प्रभाग क्र.८९ च्या लढतीत राऊत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या प्रचारासाठी श्री. राऊत यांच्यासह माजी आमदार वैभव नाईक हेही बैठका घेत आहेत. सांताक्रूझ (पूर्व) या प्रभाग क्र. ८९ मधून ठाकरे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युतीचे उमेदवार म्हणून गीतेश निवडणूक रिंगणात आहेत. राणे बंधूही आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. आमदार नीलेश राणे यांनी शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या सभा, मतदार गाठीभेटी सुरू आहेत. भाजपतर्फे मंत्री नीतेश राणे हेही प्रचारात सक्रिय आहेत. पक्षासाठीच्या मोर्चे बांधणीत त्यांनी आघाडी घेतली आहे.