महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवाद पुणेकरांशी या कार्यक्रमात अभिनेत्री गिरीजा ओक हिने मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढता येणार नाही हे आधीच लक्षात आलं होतं असंही त्यांनी सांगितलं.
पिंपरी चिंचवड, पुण्यात जिथं जिथं आपण लढतोय तिथं मैत्रीपूर्ण लढती असल्याचं समजूया असं मी म्हटलं होतं. आतापर्यंत मी संयम पाळलाय पण त्यांचा संयम ढळलाय. निवडणुकीतली स्थिती पाहून कदाचित दादांचा संयम कमी झाला असावा. १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलंठाकरे बंधू एकत्र आल्याच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोणतंही कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे. राज ठाकरेंनी याचं क्रेडिट मला दिलं याचा आनंद वाटतो. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की दोघे एकत्र यावेत. ते एकत्र येत असतील तर आनंदच आहे आणि त्याचा आशीर्वाद मलाच मिळेल. बहीण-भाऊ एकत्र आलेत का याचा मला अंदाज नाही असं म्हणत पवार कुटुंबाबाबत फडणवीस यांनी बोलणं टाळलं.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचाराच्या शेवटच्या रविवारी पिंपरी-चिंचवड रोड शो आणि त्यानंतर पुण्यात मुलाखतीच्या माध्यमातून पुणेकरांशी संवाद साधला. गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी शायरीने सुरुवात केली. "तमाम उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना पोछता रहा," अशा शब्दांत त्यांनी थेट नाव न घेता उपमुख्यमंत्री पवार यांना टोला लगावला.
भोसरी येथे झालेल्या कोपरा सभेतही त्यांनी "क्यूँ पड़े हो चक्कर में, कोई नहीं टक्कर में," असे म्हणत नाव न घेता अजित पवार यांच्यावर टोला लगावला. यापूर्वी शनिवारी आकुर्डीतील सभेतही फडणवीस यांनी शेरो-शायरीतून विरोधकांवर निशाणा साधला होता. परिंदे को मिलेगी मंजिल यकीनन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं; और वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं," म्हणत थेट पवार यांच्यावर निशाणा साधला होता. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या शेरो-शायरीचा विषय चर्चेचा ठरत असून, त्यातून राजकीय टीका अधिक धारदार होत असल्याचे चित्र आहे.