गुजरात टेबल टॉपर, मुंबई इंडियन्सची मोठी घसरण, रोमांचक सामन्यानंतर WPL Points Table मध्ये उलथापा
Marathi January 12, 2026 02:25 PM

WPL 2026 पॉइंट टेबल अपडेट : सोफी डिव्हाईनच्या अफलातून ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर गुजरात जायंट्स संघाने वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयासह गुजरातने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला मागे टाकत गुजरातने पहिल्या क्रमांकावर आपली पकड मजबूत केली. WPL च्या इतिहासात प्रथमच गुजरात जायंट्सने हंगामातील पहिले दोन सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे. याचवेळी, दिल्ली कॅपिटल्सला देखील पहिल्यांदाच सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

WPL 2026 पॉइंट्स टेबलमध्ये मोठे बदल

कर्णधार अ‍ॅशले गार्डनरच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्सने पहिल्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा, तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. विशेष म्हणजे या दोन्ही सामन्यांत गुजरातने प्रथम फलंदाजी करत 200 पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारला. दोन सामन्यांत दोन विजयांसह गुजरातच्या खात्यात 4 गुण जमा झाले असून संघ थेट पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

मुंबई इंडियन्सला धक्का!

गुजरातच्या विजयाचा फटका मुंबई इंडियन्सला बसला असून हरमनप्रीत कौरचा संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. मुंबईला हंगामाच्या पहिल्या सामन्यात आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून खाते उघडले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खात्यातही 2 गुण आहेत, मात्र खराब नेट रन रेटमुळे आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहे. यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे खाते मात्र अद्याप उघडलेले नाही.

गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना कसा रंगला?

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत गुजरात जायंट्सने 20 षटकात 209 धावा केल्या. सोफी डिव्हाईन शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचत 95 धावांची झंझावाती खेळी केली, तर कर्णधार अ‍ॅशले गार्डनर 49 धावा केल्या. दिल्लीकडून नंदिनी शर्मा हिने हॅट्ट्रिकसह 5 विकेट्स घेत दमदार गोलंदाजी केली. 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीसाठी लिझेल ली (86) आणि लॉरा वोल्वार्ड्ट (77) यांनी जबरदस्त फलंदाजी केली, मात्र शेवटच्या षटकात आवश्यक असलेल्या 7 धावा काढण्यात दिल्ली अपयशी ठरली आणि संघाला पराभव स्वीकारावा लागला.

हे ही वाचा –

Virat Kohli News : रोहित शर्मा आऊट होताच, विराट कोहली प्रेक्षकांवर संतापला, तोंडून निघालं MS Dhoni चं नाव, नको नको ते बोलला

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.