हिंदुस्थानचा धावांचा बादशाह’ विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक ऐतिहासिक अध्याय लिहिला. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने तिन्ही फॉर्मेट मिळून 28,000 धावांचा टप्पा सर्वांत वेगाने पार करत नवा विक्रम आपल्या नावावर केला. यासोबतच तो सचिन तेंडुलकर यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.
आपल्या कारकीर्दीतील 624 व्या डावात खेळताना कोहलीने न्यूझीलंडच्या लेगस्पिनर आदित्य अशोकच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. सचिन तेंडुलकरांना हा टप्पा गाठण्यासाठी 644 डाव लागले होते, तर श्रीलंकेचा कुमार संगक्कारा 666 डावांत 28 हजार धावांच्या क्लबमध्ये दाखल झाला होता.
या सामन्यापूर्वी कोहलीच्या खात्यात 27,975 आंतरराष्ट्रीय धावा होत्या. सचिन तेंडुलकरांनी 782 डावांत 34,357 धावा केल्या, तर संगक़्काराने 666 डावांत 28,016 धावा जमवल्या आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये कोहलीने केवळ 549 डावांत 25 हजार धावा पूर्ण करत सर्वांत जलद फलंदाज होण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये 26 हजार आणि सप्टेंबर 2024 मध्ये 594 व्या डावात 27 हजार धावांचा टप्पा पार करत त्याने आपली विक्रमी घोडदौड कायम ठेवली आहे.
गांगुलीच्याही पुढे कोहली
विराट कोहलीने मैदानात पाऊल टाकताच इतिहास रचला. विशेष म्हणजे या विक्रमासाठी त्याला फलंदाजीही करावी लागली नाही. मैदानात उतरताच कोहलीने हिंदुस्थानकडून सर्वाधिक वन डे सामने खेळणाऱया खेळाडूंच्या यादीत सौरभ गांगुलीला मागे टाकले. हा कोहलीचा 309 वा एकदिवसीय सामना ठरला, तर गांगुलीने 308 सामने खेळले होते. आता या यादीत सचिन तेंडुलकर (463), एम. एस. धोनी (347), राहुल द्रविड (340) आणि मोहम्मद अझरुद्दीन (334) यांच्या पाठोपाठ कोहलीचे नाव आहे. 2027 च्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत खेळण्याचे लक्ष्य ठेवलेल्या कोहलीला पुढील काळात ही यादी आणखी वर चढण्याची संधी आहे.