वय अवघं आठ, पण जिद्द अफाट
ओम भंगाळेने १७ किमी सागरी अंतर पोहत केले पार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : डोंबिवली येथील ओमकार इंटरनॅशनल शाळेत तिसरीत शिकणारा अवघ्या आठ वर्षांचा ओम भंगाळे याने आपल्या जिद्द आणि मेहनतीने शहराचा लौकिक वाढवला आहे. अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत तब्बल १७ किलोमीटरचे सागरी अंतर पोहत पार करून त्याने इतिहास घडवला आहे.
लहानपणापासूनच ओम याला पोहण्याची विशेष आवड होती. डोंबिवलीतील यश जिमखाना येथे प्रशिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने जलतरणाचे धडे गिरवले. स्विमिंग पूलमधील सरावादरम्यानच त्याच्या मनात समुद्रात पोहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. विशेष म्हणजे याआधी तो कधीही समुद्रात उतरलेला नव्हता. परंतु मलाही समुद्रात पोहायचंय, असे तो सतत आई-वडिलांना सांगायचा. पालकांनी ओमच्या स्वप्नाला पाठिंबा दिला आणि त्याने समुद्रात तीन सराव सत्रे पूर्ण केली. त्यानंतर संतोष पाटील यांच्या सल्ल्याने स्विमिंग पूलमधील सरावाचा कालावधी वाढवण्यात आला. प्रशिक्षक विलास माने आणि रवि नवले यांनी दररोज तीन ते चार तास त्याच्याकडून कठोर सराव करून घेतला.
गुरुवारी (ता. ८) पहाटे चार वाजून २३ मिनिटांनी अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहण्याचा ऐतिहासिक उपक्रम सुरू झाला. अरबी समुद्रात समुद्रदेवतेची पूजा करून ओमच्या शरीरावर ग्रीस लावण्यात आले. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या उपस्थितीत ओमने समुद्रात झेप घेतली. दरम्यान, ओमचे पुढील लक्ष्य आणखी मोठे असून धरमतर (अलिबाग) ते गेटवे ऑफ इंडिया ३६ किलोमीटरचे सागरी अंतर पोहत पार करण्याचा त्याचा निर्धार आहे.
प्रतिकूल परिस्थितीशी सामना
थंड वातावरण, अंधार, जोरदार वारे, मोठ्या जहाजांच्या लाटा आणि समुद्रातील तेलकट पाणी अशा प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत ओमने आपली गती कायम ठेवली. पाण्यावरील तेलाच्या थरामुळे त्याला उलटीसारखे होत असतानाही त्याने हार मानली नाही. अखेर अवघ्या दोन तास ३३ मिनिटांत ओमने १७ किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचताच उपस्थित नागरिक, प्रशिक्षक, नातेवाईक आणि मित्रांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. ओमच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला सर्वत्र सलाम केला जात आहे.