बिनविरोध निवडणुकीविरोधात जनहित याचिका
मतदान बंधनकारक करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ठाणे महापालिका निवडणुकीत काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून देताना मतदान न घेण्याच्या प्रचलित पद्धतीला आव्हान देत सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा मतदानाचा आणि ‘नोटा’द्वारे असहमती नोंदवण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा गंभीर मुद्दा या याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत ३१ डिसेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर ५(अ), १४(अ), १७(ब), १८(ब), १८(क) आणि १८(ड) या सहा प्रभागांतील एक वगळता सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परिणामी, उर्वरित उमेदवारांना कोणतेही मतदान न घेता बिनविरोध ठरले आहे. त्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत नमूद केले आहे की, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान आणि मतमोजणी ही अनिवार्य प्रक्रिया आहे; मात्र बिनविरोध निवडीच्या नावाखाली ही संपूर्ण प्रक्रिया टाळली जात असून त्यामुळे मतदारांचा ‘नोटा’ निवडण्याचा अधिकार संपुष्टात येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नोटा हा मतदाराचा महत्त्वाचा घटनात्मक अधिकार असून, तो निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे.
घटनात्मक वैधतेवर प्रश्न
काही प्रभागांमध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित उमेदवारांच्या फायद्यासाठी इतर उमेदवारांवर दबाव टाकून सामूहिक माघारी घडवून आणली जात असल्याची प्रवृत्ती वाढत असल्याबद्दलही याचिकेत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशा प्रकारांमुळे लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होतो, असे याचिकेत नमूद केले आहे. ही याचिका कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या निवडीला थेट आव्हान देत नसून, मतदान न घेता उमेदवार बिनविरोध निवडून घोषित करण्याच्या कायदेशीर आणि घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करते, असे याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.