पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीत सध्या भारतीय क्रिकेट संघ व्यस्त आहे. विश्वचषकापूर्वी भारताची अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका ही न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका असणार आहे. मात्र त्याआधी सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याची चिन्हे दिसत आहेत. स्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर या सामन्यात जखमी झाला असून, यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेची सुरुवात दमदार पद्धतीने झाली असून, पहिला सामना भारताने जिंकला. मात्र या विजयात एक चिंतेची बाब समोर आली आहे. सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदर जखमी झाल्याचे समजते. सध्या त्याच्या दुखापतीची तीव्रता किती आहे, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बीसीसीआयकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र संघ व्यवस्थापन सतर्क झाले आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, वॉशिंग्टन सुंदर उर्वरित दोन वनडे सामन्यांतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. ही बाब भारतीय संघासाठी अधिक चिंताजनक आहे, कारण सुंदर केवळ या वनडे मालिकेचाच नव्हे, तर त्यानंतर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचाही भाग आहे. विशेष म्हणजे, त्याची निवड टी-20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातही करण्यात आली आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी त्याच्या दुखापतीवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, याआधीच तिलक वर्मा हा खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांतून बाहेर पडल्याचे समोर आले आहे. तो उर्वरित दोन सामने खेळू शकेल की नाही, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. विश्वचषक संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू जखमी होणे ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
पहिल्या वनडे सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने पाच षटकांची गोलंदाजी करत 27 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. फलंदाजीत त्याला सहा विकेट पडल्यानंतर आठव्या क्रमांकावर पाठवण्यात आले. त्याने सात चेंडूंमध्ये सात धावा करत नाबाद राहत संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला.