भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI वॉशिंग्टन सुंदरला भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतून वगळल्याची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. वॉशिंग्टन सुंदरला वडोदरा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापत झाली. गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली, ज्यामुळे पाच षटके टाकल्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. जरी तो गरज पडल्यास फलंदाजी करण्यासाठी परतला असला तरी, त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसून येत होत्या. सामन्यानंतर सुंदरचे स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये त्याच्या दुखापतीची पुष्टी झाली आणि तो मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी आयुष बदोनीचा संघात समावेश करण्यात आला आहे. बदोनी पहिल्यांदाच भारतीय ड्रेसिंग रूमचा भाग असेल.
वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापती आणि त्याच्या जागी निवडीची माहिती देताना बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे की, “रविवारी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला डाव्या खालच्या बरगडीत तीव्र वेदना जाणवल्या. त्याचे पुढील स्कॅन केले जातील, त्यानंतर बीसीसीआयची वैद्यकीय टीम तज्ञांचा सल्ला घेईल.”
वॉशिंग्टनला एकदिवसीय मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे.
पुरुष निवड समितीने त्याच्या जागी आयुष बदोनीची निवड केली आहे. बदोनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी राजकोट येथे संघात सामील होईल.
दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आयुष बदोनी