एकाच षटकाराने केएल राहुलने विराट कोहलीला मागे टाकलं; आता फक्त एमएस धोनीच पुढे
Marathi January 12, 2026 07:25 PM

केएल राहुल हा भारतीय क्रिकेटमधील असा खेळाडू आहे, जो संघाच्या गरजेनुसार कोणतीही भूमिका यशस्वीपणे निभावू शकतो. आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून आजपर्यंत राहुलने सलामीवीर, मधल्या फळीतील फलंदाज, विकेटकीपर आणि आता वनडेमधील फिनिशर अशी विविध रूपं दाखवली आहेत. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात राहुलने षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला आणि त्याचसोबत एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.

वडोदऱ्यात झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 300 धावांचा मोठा डोंगर उभा केला. भारताने या लक्ष्याचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली होती, मात्र मधल्या फळीत सलग विकेट पडल्याने संघ अडचणीत सापडला. अशा निर्णायक क्षणी केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.

राहुलने केवळ 21 चेंडूंमध्ये नाबाद 29 धावा केल्या. या खेळीत दोन चौकार आणि एक निर्णायक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला. याच षटकाराच्या जोरावर राहुलने सामना भारताच्या बाजूने झुकवला. त्याची संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी भारताच्या विजयाची गुरुकिल्ली ठरली.

या कामगिरीसह केएल राहुलने एक खास विक्रमही प्रस्थापित केला. वनडे क्रिकेटमध्ये षटकार मारून भारताला विजय मिळवून देणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राहुलने आतापर्यंत 6 वेळा षटकारच्या जोरावर टीम इंडियाला जिंकवलं आहे. या यादीत माजी कर्णधार एमएस धोनी 9 वेळा असा पराक्रम करत पहिल्या स्थानावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 5 वेळा षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला असून, त्यामुळे तो आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

सध्या केएल राहुल या मालिकेत विकेटकीपर-फलंदाज म्हणून खेळत असून, खालच्या फळीत फलंदाजी करत असल्याने त्याच्यावर फिनिशरची जबाबदारी अधिक आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन वनडे सामन्यांतही राहुलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे केएल राहुलला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत आणि आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. तरीही वनडे क्रिकेटमध्ये त्याने दाखवलेला फिनिशर अवतार भारतीय संघासाठी नक्कीच दिलासादायक ठरत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.