पुण्याच्या हवेली तालुकर्यातील गाऊडदरा परिसरात शेतात काम करत असताना एक महिला अचानक विहिरीत पडली. जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करण्याचा तिने प्रयत्न केला. पाण्यात हातपाय मारले, पण ती वाचू शकली नाही. अखेर तिला वाचवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी ऑक्सिजन मास्क लावून विहिरीत उडी घेतली. स्कूबा पद्धतीने महिलेचा विहिरीत शोध घेतला आणि अखेर तिचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
उज्ज्वला शत्रुघ्न वावळ ही 40 वर्षीय महिला विहिरीत पडून दगावली आहे. ती पुण्याच्या हवेली तालुक्यातील गाऊडदराची रहिवाशी आहे. उज्ज्वला वावळ या नेहमीप्रमाणे शेतात काम करत होत्या. दुपारच्या सुमारास त्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या असता अचानक पाय घसरून त्यांचा तोल गेला आणि त्या थेट विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि पाण्याची पातळी अधिक असल्याने त्या पाण्यात बुडाल्या. काही वेळानंतर त्या परत न आल्याचे लक्षात येताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला.
पाच तास शोध मोहिम
घटनेची माहिती मिळताच पुणे आपत्ती व्यवस्थापन, हवेली वेल्हा आपत्ती व्यवस्थापन, भोईराज आपत्ती व्यवस्थापन (शिरवळ), पीएमआरडीए अग्निशमन दल तसेच PDRF (पुणे आपत्ती प्रतिसाद पथक) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्व यंत्रणांनी समन्वय साधत संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. विहिरीतील पाणी खोल आणि गढूळ असल्याने शोधकार्य आव्हानात्मक ठरले. अशा परिस्थितीत पाण्याखाली उतरण्यासाठी ऑक्सिजन मास्कचा वापर करून स्कुबा-प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला. प्रशिक्षित पथकाने पाण्यात उतरून पद्धतशीर शोध सुरू केला. सलग चार ते पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्याखाली मृतदेहाचा ठावठिकाणा लागला. ऑक्सिजनच्या साहाय्याने पाण्यात उतरून शोध घेणाऱ्या पथकामुळे मृतदेह तुलनेने लवकर बाहेर काढणे शक्य झाले.
या संपूर्ण मोहिमेत हवेली आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तानाजी भोसले, संजय चोरगे पाटील, उत्तम पिसाळ, प्रतीक महामुनी, संतोष भगत, योगेश गोपी आणि विक्रम हिरामणे यांनी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच पीएमआरडीए अग्निशमन दलातील वाहन चालक प्रेमसागर राठोड, अग्निशमन विमोचक सुनिल चामे आणि अग्निशमन विमोचक निकेत चव्हाण यांनी प्रत्यक्ष शोध आणि बचाव कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
पीडीआरएफ (पुणे आपत्ती प्रतिसाद पथक) मधील वाहन चालक अनिल शिंदे, जवान अजय सावंत व जवान विशाल माळी यांनी पाण्यात उतरून शोधकार्य व मृतदेह बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले. विविध यंत्रणांमधील समन्वय, आधुनिक उपकरणांचा वापर आणि प्रशिक्षित मनुष्यबळामुळे ही कठीण मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
तपास सुरू
या घटनेची माहिती पतीतर्फे खेडशिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे वावळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गाऊडदरा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.