तात्या लांडगे
सोलापूर : महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे. प्रचार संपल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाची भरारी पथके व शहर पोलिसांच्या पथकांची नजर उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभने दाखविण्याच्या प्रकारांवर असणार आहे. त्यासाठी शहर गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण पथके, गुप्तवार्ता पथकांसह खबऱ्यांना कामाला लावले आहे.
सोलापूर शहरात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यात बाहेरून एक हजार होमगार्ड आणि ४७५ अंमलदार, एक राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी दाखल झाली आहे. तसेच एक पोलिस उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त आणि ४० अधिकारी देखील आले आहेत. प्रचार संपल्याच्या रात्रीपासून (१३ जानेवारी) १७ जानेवारीपर्यंत शहरभर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
मतदानादिवशी बूथ, १०० मीटर बंदोबस्त, संवेदनशील ४६ ठिकाणी बंदोबस्त नेमला जाणार आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी आज (रविवारी) सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचे नियोजन केले. यात्रा व निवडणूक दोन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी पोलिसांना पार पाडाव्या लागत आहेत.
बंदोबस्ताचे चोख नियोजन
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा व महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक व बाहेरील बंदोबस्त नेमला आहे. १३ जानेवारीच्या रात्रीपासून पोलिस ठाण्यासह गुन्हे प्रकटीकरण व शहर गुन्हे शाखेची पथकांची आणि दामिनी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सेक्टर अधिकारी, बीट मार्शल यांची गस्त राहणार आहे.
- डॉ. अश्विनी पाटील, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
रात्री १० नंतर सर्व दुकाने बंद
महापालिका निवडणुकीचा प्रचार १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे. त्या दिवशीपासून रात्री दहानंतर एकही दुकान सुरू असणार नाही. चहा कॅन्टिन, पान टपऱ्यांसह सर्व दुकाने, पक्ष कार्यालये, उमेदवारांची संपर्क कार्यालये रात्री दहापूर्वी बंद होतील. याची प्रभावी अंमलबजावणी शहर पोलिसांच्या माध्यमातून होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांचीही नजर सर्व पक्ष कार्यालयांसह उमेदवारांच्या हालचालींवर असणार आहे.