कलमठकरांचा निर्णय राज्यासाठी आदर्शवत
esakal January 13, 2026 07:45 AM

kan121.jpg
17116
कलमठ : येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अभिनेता पृथ्वीक प्रताप, बाजूला अभिनेत्री रसिका वेंगुलेकर, सरपंच संदीप मेस्त्री आदी

कलमठकरांचा निर्णय राज्यासाठी आदर्शवत
पृथ्वीक प्रताप : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जनजागृती फेरी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १२ : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी विधवा महिलांसाठी अलंकार न तोडणाऱ्या महिलांची घरपट्टी व पाणीपट्टी आयुष्यभरासाठी माफ करण्याचा कलमठ ग्रामपंचायतीचा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी व्हायला हवी, असे प्रतिपादन अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी केले.
मुुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने कलमठ मांड येथून ग्रामपंचायतपर्यंत भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित होते. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच संदीप मेस्त्री, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग उपस्थित होते.
अभिनेता पृथ्वीक प्रताप म्हणाले, “सरपंच संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीत शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. जलसंवर्धन, महिला बचत गट, आदर्श शाळा, डिजिटल सेवा योजना यांसारखे उपक्रम प्रेरणादायी आहेत. मात्र विधवा महिलांसाठी घेतलेला घरपट्टी व पाणीपट्टी माफीचा निर्णय मनाला भावणारा आहे. आपण पुरोगामी विचार जपले तरच खरा पुढारी घडतो. हा निर्णय मी माझ्या आईला नक्की सांगणार आहे.”
अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर म्हणाल्या, “कलमठ गावात राबवण्यात येणारे नवे उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत. कोकणातली मुलगी म्हणून मला अभिमान वाटतो. गावाला उत्तम नेतृत्व लाभले असून सर्वजण एकत्र येऊन प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे गावाची प्रगती होत असून पुढची पिढीही याच संस्कारांत घडत आहे.”
सरपंच संदीप मेस्त्री यांनी माहिती देताना सांगितले की, हे अभियान आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून राबवत असून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. ग्रामपंचायतीत सर्व दाखले उपलब्ध करून दिले जात आहेत. आतापर्यंत ४०० विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले आहे. गरजू महिला व किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड एटीएम मशीन बसवण्यात आली असून दरमहा पाच पॅड मोफत दिले जात आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १४ लाभार्थ्यांसाठी एकत्रित गृहप्रकल्प साकारला जात आहे. विधवा महिलांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी माफीच्या निर्णयाची दखल महिला आयोगाने घेतली असून हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व उपक्रमांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व गटविकास अधिकारी रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सरपंचांनी नमूद केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.