भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना हा राजकोटमधील निंरजन शाह स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडला मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार मायकल ब्रेसवेल याने फिल्डिंगचा निर्णय करत भारताला बॅटिंगची संधी दिली आहे. यासह भारताच्या सलग दुसऱ्या विजयाची शक्यता आणखी वाढली आहे.
राजकोटमध्ये झालेल्या शेवटच्या 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीची संधी दिलीय. राजकोटमधील या मैदानात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 322 इतकी आहे. तसेच या मैदानात 300 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणं सोपं नाही. त्यामुळे या मैदानात सलग पाचव्यांदा बॅटिंग करणारा संघ जिंकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. वॉशिंग्टन सुंदर याला पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. सुंदरच्या जागी नितीश कुमार रेड्डी याचा समावेश करण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडनेही प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. टीम मॅनेजमेंटने जेडन लेनोक्स याचा समावेश केला आहे. यासह जेडनचं एकदिवसीय पदार्पण झालं आहे. जेडनला आदित्य अशोक याच्या जागी संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णा.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : डेव्हॉन कॉनव्हे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, जेडन लेनोक्स, क्रिस्टियन क्लार्क आणि कायल जेमिसन.