लहान वयात आजूबाजूला घडणाऱ्या काही घटनांचे मुलांचा मनावर परिणाम होत असतो. त्यांचा विकास होण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले असणेही गरजेचे आहे. घरातच मुले आई- वडिलांच्या वागण्याचे निरीक्षण करतात. त्यामुळे मुलांसमोर आई वडिलांनी काही गोष्टी करणे टाळावे. कारण याच सवयींचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
पालकांकडून अनेकदा नकळत होणारी चूक म्हणजे मुलांना छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावणे. मुलांना सतत रागावल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. तसेच त्यांना कोणत्याही गोष्टींमध्ये रस राहत नाही.
अनेकदा पालक इतर मुलांशी आपल्या मुलांची तुलना करतात. पण असे करणे चुकीचे आहे. यामुळे मुलांना स्वतःची लाज वाटायला लागते.
मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा मुले रडतात किंवा दुखी असतात तेव्हा पालक त्यांना रागावून गप्प करतात. पण याउलट मुलांशी संवाद साधा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या भावनेकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यात एकटेपणाची भावना निर्माण होते आणि याचा थेट त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
मुलांना स्क्रीन टाइमपासून दूर ठेवा. पालक स्वतः कामात व्यस्त असले की मुलांना मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपवर कार्टून, गाणी लावून देतात. यामुळे गप्प एका ठिकाणी बसतात असं पालकांना वाटते. पण यामुळे मुलांच्या एकाग्रतेवर, झोपेवर आणि मनःस्थितीवर परिणाम होतो.
मुलांना कोणत्याही बाबतीत दबाव टाकणे चुकीचे आहे. अभ्यास करण्यासाठी त्यांच्यावर प्रेशर टाकू नका. यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होते.
आई- वडिलांमध्ये भांडणं झाल्यास मुलांना त्रास होतो. यामुळे मुलांसमोर भांडणे टाळा. आई- वडिलांनी मुलांशी मित्रत्वाचे नाते ठेवावे. यामुळे मुले त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात आणि मोकळे राहतात. तज्ञांच्या मते, मुलांशी चांगला संवाद ठेवणे, त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्यावर दबाव न टाकणे, त्यांना समजून घेणे याच गोष्टींमुळे त्यांचा मानसिक विकास चांगला होतो.