पाली : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवाचा आनंद लुटताना पक्षी आणि वन्यजीवांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध आता सुधागड पाली वन विभागाने कठोर पवित्रा घेतला आहे. नायलॉन किंवा सिंथेटिक मांजाची विक्री, साठवणूक आणि वापर करणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत कडक कारवाई करण्याचे आदेश वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनावणे यांनी दिले आहेत.
दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजामध्ये अडकून शेकडो पक्षी जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. हा धागा प्लास्टिक-आधारित असल्याने तो निसर्गात नष्ट होत नाही आणि अनेक वर्षे पर्यावरणाला हानी पोहोचवत राहतो. यामुळे केवळ पक्षीच नव्हे, तर माकडे आणि मानवांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण होतो. सुधागड पाली वन विभागातर्फे सध्या विशेष तपासणी मोहीम आणि जनजागृती सुरू करण्यात आली असून, सुरक्षित पतंगोत्सवासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Pune Voter Awareness : स्वीप कक्षामार्फत पुण्यात मतदान जनजागृती उपक्रमाचे आयोजनकायदेशीर कारवाईचा बडगा
मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या (NGT) आदेशानुसार नायलॉन मांजावर पूर्णपणे बंदी आहे. सुधागड पाली वन विभागाने स्पष्ट केले आहे की, नायलॉन मांजामुळे एखाद्या पक्ष्याला इजा झाल्यास किंवा मृत्यू ओढवल्यास संबंधित व्यक्तीवर थेट वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होईल. विक्रेते, साठवणूकदार आणि वापरकर्ते या सर्वांवर वन विभाग लक्ष ठेवून आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ५ नुसार यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
नागरिकांना आवाहन आणि तक्रार केंद्र
वन विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, जर कुठेही नायलॉन मांजाची विक्री किंवा साठवणूक होत असल्याचे आढळल्यास, त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे. वन विभागाच्या १९२६ या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
पर्यावरण आणि वन्यजीवांचे रक्षण करणे ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे टाळून पर्यावरणस्नेही सण साजरा करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
विशाल सोनावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुधागड पाली