रेवदंड्याला थेट ‘लालपरी’चा दुष्काळ
लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद; आरक्षण नसल्यास मुरूडच्या बस थांबतच नाहीत
ज्येष्ठ नागरिकांपासून चाकरमान्यांपर्यंत सर्वच प्रवासी त्रस्त
रेवदंडा, ता. १४ (बातमीदार) : रेवदंडा बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या लालपरी थांबणे अलिबाग व अन्य आगारांनी बंद केल्याने रेवदंडा-चौल-नागाव-आक्षीपर्यंतच्या गावकऱ्यांना पर्यायी मार्गाचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढती लोकसंख्या, पर्यटकांची रेलचेल आणि शहरीकरण असूनही या परिसराला थेट बससेवेचा ‘वाली’ मिळेल का, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
मुरूड आगार सुरू होण्यापूर्वी अलिबाग आगार रेवदंडा-मुंबई मार्गावर दिवसभर दोन ते पाच तसेच रात्रराणी अशी थेट सेवा देत होता. बोरिवली, ठाणे, कल्याणसारख्या मार्गांवरही थेट जोडणी होती. मात्र आता मुरूड आगारातून येणाऱ्या बस आरक्षण नसल्यास रेवदंडा येथे न थांबता थेट पुढे जातात. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना अलिबाग बस स्थानक खासगी वाहनाने गाठत पुढील प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढत आहेत.
पेण आगारातून सकाळी थेट औरंगाबादपर्यंत सेवा मिळत असल्याने पुणे मार्ग प्रवाशांसाठी सोयीस्कर होता; मात्र तीही बंद झाली. काही काळ नालासोपारा आगाराने दुपारी थेट ‘निम आराम’ रेवदंड्यापर्यंत चालवली होती; तीही थांबवण्यात आली. मुरूड आगाराची औरंगाबाद लालपरीही बंद झाली. तर रोहा आगाराने रोहा-बोरिवली सकाळ व दुपारच्या दोन्ही फेऱ्या बंद केल्याने शिरगाव, वळके, चोरडा, कोकबन, चणेरा आदी पंचक्रोशीतील चाकरमान्यांचे हाल वाढले आहेत.
प्रवासी जोडो अभियानऐवजी प्रवाशांनाच वेठीस धरण्याची स्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
चौकट
खासगी वाहनांवर अवलंबित्व
थेट बससेवा बंद झाल्याने रेवदंड्यातील प्रवाशांना अलिबाग गाठण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे प्रवास खर्चात ३०-५०% वाढ तसेच प्रतीक्षेचा त्रास सहन करावा लागतो. पर्यटन हंगामात हा ताण दुपटीने वाढतो.