बनावट कागदपत्रांवर सिडकोचा भूखंड हडप
esakal January 15, 2026 11:45 AM

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : सिडकोच्या मालकीचा कोपरखैरणे सेक्टर ११ येथील भूखंड क्रमांक ११८ बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, संशयितांनी सिडकोच्या नावाने बनावट त्रिपक्षीय करारनामा व साडेबारा टक्के योजनेतील बनावट वाटप कागदपत्रे तयार करून नवी मुंबई महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळवली आणि त्या आधारे चार मजली इमारत उभी केली. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात बामूबाई हरिराम भोईर, अरुण हरिराम भोईर, त्रिपक्षीय करारनामाधारक मे. आर. एस. रियल्टीतर्फे भागीदार राजेंद्र विठ्ठल शिंदे, तसेच बांधकामधारक अंगद सिंग आनंद या चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२०१० मध्ये त्यांनी सिडकोने सामाजिक, सार्वजनिक सेवेसाठी आरक्षित ठेवलेला १०८ चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड १२.५ टक्के योजनेअंतर्गत वाटप झाल्याचे भासवणारी बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच सिडकोचा बनावट त्रिपक्षीय करारनामा तयार करून तो महापालिकेच्या नगररचना विभागात सादर केला. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी बांधकाम परवानगी मिळवून या भूखंडावर चार मजली इमारत उभारली. त्यानंतर हा भूखंड तृतीय पक्षाला हस्तांतरित केला. हा भूखंड मुळातच १२.५ टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्यायोग्य नसल्यामुळे सिडकोने तो सामाजिक, सार्वजनिक सेवेसाठी राखीव ठेवला होता. त्यामुळे सिडको कार्यालयात या भूखंडाच्या वाटपाबाबत कोणतीही अधिकृत नोंद अस्तित्वात नव्हती.

२०१९ मध्ये सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने या इमारतीवर कारवाईची नोटीस बजावल्यानंतर बांधकामधारकाने बेलापूर न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रकरणादरम्यान कागदपत्रांची पडताळणी केली असता हा प्रकार बनावट दस्तऐवजांवर आधारित असल्याचे उघड झाले. त्यानंतर सिडकोच्या भूमी व १२.५ टक्के योजना विभागाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.