एसएसटी महाविद्यालयाचा पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक
कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : ठाणे जिल्हा वाहतूक पोलिस आयुक्तालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय पथनाट्य स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत एसएसटी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पथनाट्याद्वारे त्यांनी वाहतुकीचे नियम आणि जीविताची सुरक्षा याविषयी उत्कृष्ट सादरीकरणाद्वारे नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात महाविद्यालयाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सोहळ्यास चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, उद्योजक अभिजीत गणू, पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांची उपस्थिती होती.
रस्ता सुरक्षा अभियानात विशेष सहकार्य केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांचा आणि जिल्हा समन्वयकाची उत्कृष्ट भूमिका बजावल्याबद्दल उपप्राचार्य व ठाणे जिल्हा एनएसएस समन्वयक प्रा. जीवन विचारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे महाविद्यालय व्यवस्थापन, प्राध्यापकवर्गाने शुभेच्छा दिल्या आहेत.