Maharashtra Election 2026 : राज्यभरात सकाळपासूनच महानगरपालिकांच्या मतदानासाठी सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, अशातच मतदानाच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये अनेक घटना घडू लागल्या आहेत. अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदानास उशीर झाला तर अनेक मतदारांनी मतदार यादीतून नावे गायब असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
या सर्व गोंधळात आणखी एक गंभीर बाब समोर आली असून मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई सहजपणे पुसली जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यंदा निवडणूक आयोगाने पारंपरिक न पुसली जाणारी शाई न वापरता पेनद्वारे बोटावर खूण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही शाई साध्या नेलपेन्ट रिमुव्हरने सहज पुसली जात असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.
या प्रकारामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, याबाबत अनेक राजकीय नेत्यांनी स्वत: हे दाखवत त्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर गंभीर चिंता व्यक्त केली जात असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सचिन सावंत यांनी थेट शेअर केला व्हिडीओ
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःच्या बोटावरील शाई सहजपणे पुसली जात असल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी पत्नीच्या बोटावरील शाई नेलपेन्ट रिमुव्हरच्या साहाय्याने कशी पुसता याचे देखील प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखवले आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून मतदान प्रक्रियेची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून केली जात आहे. निवडणूक आयोग या प्रकरणाची दखल घेते का आणि पुढील काही तासांत काय निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.