नाशिक येथे भरलेल्या तीन दिवसीय सत्ताविसाव्या अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे रविवारी अकरा जानेवारी रोजी सूप वाजले
esakal January 15, 2026 08:45 PM

या संमेलनात अनेक लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी भाग घेतला. साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ संपादक-लेखक उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष फादर एरॉल फर्नांडिस, वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसूझा यांची भाषणे झाली.

संमेलनाच्या मंचाला `फादर फ्रान्सिस दिब्रिटो विचारपीठ' असे नाव देण्यात आले होते. फादर दिब्रिटो यांचे २०२० साली निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच हे मराठी साहित्य संमेलन भरत होते.

फलकावर एका बाजूला फादरांचे आणि दुसऱ्या बाजूला कविवर्य कुसुमाग्रज यांची छायाचित्रे होती. संमेलनाच्या प्रवेशद्वाराला रेव्ह. नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांचे नाव देण्यात आले होते.

मंचावर एका अग्रस्थानी संविधानाची उद्देशिका ठेवण्यात आली. संमेलनाच्या सुरुवातीलाच या उद्देशिकेचे जमलेल्या सर्वांनी सामुदायिक वाचन केले.

साहित्य संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांच्या लिखित भाषणाच्या प्रती श्रोत्यांमध्ये वाटल्या होत्या, मात्र त्याशिवाय मार्टिन यांनी यावेळी उत्स्फूर्त मनोगत म्हणून उपस्थितांची मने जिकली.

संमेलनाच्या समारोपाच्या आपल्या भाषणात उत्तम कांबळे यांनी मार्टिन यांचे मनोगत `सर्वोत्तम' असे वर्णन केले.

साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अमित त्रिभुवन यांनी केले. कार्यक्रमस्थळी नुरील भोसले आणि सुनिल डिमेलो यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

संमेलनात झालेल्या विविध परिसंवादांत नितीन सरदार, डॉ सुरेश पठारे, दिलीप नाईक, नीलीमा बंडेलू, फादर आयओ कोयलो, आशिष शिंदे, सुहासिनी जाधव, वॉल्टर कांबळे, राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा कांदळकर, माजी सनदी अधिकारी बी जी वाघ वगैरेंनी भाग घेतला.

आजकाल कुठलीही `इव्हेन्ट’ असली कि तिथे सेलिब्रिटी लोकांबरोबर सेल्फी आणि फोटो घेतले जातात. इथे सेलेब्रिटी नसले तरी काही नामांकित व्यक्ती होत्या. या संमेलनात एका व्यक्तींबरोबर फोटो घेण्यासाठी काही जणांनी रांग लावली होती.

ही व्यक्ती म्हणजे `सुताराचा पोर' ही कादंबरी लिहिणारे सनी पाटोळे.

येशू ख्रिस्तावर आधारीत `सुताराचा पोर', `मुक्तिदाता मोशे', आणि राष्ट्रपिता अब्राहाम, योहान (जॉन) असे जाडजूड चरित्रग्रंथ त्यांच्या नावावर आहेत आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनसारख्या नामवंत संस्थेने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.

या सर्व कादंबऱ्यांतील सर्व पात्रे आणि कथानक अर्थात बायबलमधील आहेत.

सध्या त्यांनी नवी कादंबरी लिहायला घेतली आहे.

डोक्यावर पूर्ण सफेद केशसंभार आणि तशीच चंदेरी दाढी आणि वयोमानानुसार चालण्यावर आलेले बंधन असे व्यक्तिमत्व असलेल्या सनी पाटोळे यांनी आपल्या मनोगतातून श्रोत्यांची मने जिंकली.

आपल्या भाषणात सनी पाटोळे (वय ८६) यांनी कॉन्टिनेटल प्रकाशनाने त्यांची `सुताराचा पोर' ही कादंबरी प्रकाशनासाठी कशी स्वीकारली याची रंजक माहिती दिली.

आपल्या भाषणात सनी पाटोळे यांनी कॉन्टिनेटल प्रकाशनाने त्यांची `सुताराचा पोर' ही कादंबरी प्रकाशनासाठी कशी स्वीकारली याची रंजक माहिती दिली.

या साहित्य संमेलनात जमलेल्या श्रोत्यांची सर्वाधिक दाद मिळवणारा एक कार्यक्रम म्हणजे 'निमंत्रितांशी ऐसपैस गप्पा'.

ऑस्ट्रेलियात राहून वसईशी आणि मराठी भाषेशी आपली नाळ कायम राखणारे उद्योजक रिचर्ड नुनीस आणि कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी यशस्वी सामना देणारे मधुमेहतज्ज्ञ आणि हृदयविकारावर उपचार करणारे एम.डी. डॉक्टर विनीत वानखेडे यांच्याशी या सत्रात खुद्द संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांनी संवाद साधला.

जेसुईट फादर ज्यो गायकवाड सत्राच्या अध्यक्षस्थानी होते.

या संमेलनात पूर्वी कधीही न भेटलेल्या अनेक लोकांच्या गाठीभेटी झाल्या. विशेष नवलाची बाब म्हणजे यापैकी काही लोक मला `निरोप्या' मासिकात नियमितपणे लिहिणारा लेखक म्हणून ओळखत होते.

या संमेलनात फादर फ्रान्सिस कोरिया, सनी पाटोळे आणि मुक्ता अशोक टिळक यांचा सन्मान करण्यात आला.

संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस वाघमारे यांचा 'आदर्श कार्यकर्ता' म्हणून सन्मान करण्यात आला.

संमेलन यशस्वी होण्यासाठी वॉल्टर कांबळे, गिरीश भालतिडक, अंतोन भोसले, अरुण त्रिभुवन, माया त्रिभुवन, रोहिणी पंडित, सुहासिनी जाधव दिवाने, अर्जुन दारोळे फिलोमिना बागुल, वगैरे स्थानिक कार्यकर्त्यांनी हातभार लावला होता

कुठलेही साहित्य संमेलन म्हटले कि पुस्तकांचे स्टॉल्स असायला हवेच. जॉर्ज काळे यांच्या व्हाईट लाईट पब्लिकेशन्सचा या साहित्य नगरीत एकमेव बुक स्टॉल होता.

नाशिकच्या या सत्ताविसाव्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला माझे `शतकातील मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने' हे पुस्तक छापून माझ्या हाती पडले होते.

या संमेलनात विक्रीसाठी बरोबर नेलेल्या पुस्तकांपैकी केवळ एक प्रत शिल्लक राहिली.

देवदत्त नारायण टिळक यांनी लिहिलेले 'महाराष्ट्राची तेजस्विता पंडिता रमाबाई' हे चरित्र `ऑल टाइम बेस्ट सेलर' आहे हे या बुक स्टॉलवरील विक्रीवरून दिसून आले.

नाशिक येथे भरलेले हे तिसरे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन.

पहिले `महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलन' या शहरातच शंभर वर्षांपूर्वी १९२७ साली रेव्हरंड निकोल मॅक्नीकल यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.

पहिले ख्रिस्ती साहित्य संमेलन महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलन या नावाने भरले होते.

गेल्या शंभर वर्षांत या साहित्य संमेलनाची अनेक नामकरणे झाली आहेत. त्यानिमित्त वादविवादसुद्धा झाले आहेत.

यावेळीसुद्धा नामकरण झाले.

`अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन ' असे अधिक व्यापक, भारदस्त असे हे नामकरण आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.