जून 2025 मध्ये इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये भयंकर युद्ध झाले होते. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले होते, त्यामुळे दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले होते. तेव्हापासून इराणमध्ये अस्थिरता आहे. गेल्या काही दिवसांपासून इराणी जनता सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात इंटरनेट बंद करण्यात आले असून आंदोलकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे इराणने अमेरिकेला कारवाईची धमकीही दिली आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.
इराण आणि अमेरिकेत युद्ध सुरू झाले तर त्याचा थेट परिणान इस्रायलवर होणार आहे. संपूर्ण जग तणावात असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. इराण आणि इस्रायलने थेट युद्ध टाळण्यासाठी रशियाच्या मध्यस्थीने गुप्त संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. या दोन्ही देशांमध्ये गुप्त करार झाला आहे. इस्रायलने रशियामार्फत इराणी सरकारला संदेश पाठवला होता. यात अशी माहिती होती की, इराणने हल्ला न केल्यास इस्रायल इराणवर हल्ला करणार नाही. याला उत्तर देताना इराणनेही आश्वासन दिले की आम्ही प्रथम हल्ला करणार नाहीत. संघर्षापासून वाचण्यासाठी दोन्ही देशांनी हा करार केला आहे. मात्र या कराराबाबत अमेरिकेला कोणतीही माहिती नव्हती अशी माहिती समोर आली आहे.
गेल्या काही काळापासून इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात हजारो आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेकिलेने इराणवर हल्ला करण्याची भाषा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे इराणच्या अणु सुविधा आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्थळांवर हल्ले करण्यापासून ते सायबर हल्ल्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे इस्रायल सरकारही हाय अलर्टवर आहे. इस्रायली सैन्य परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. लष्करप्रमुख सतत परिस्थितीचा आढावा घेत असून सैनिकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर इराण देखील प्रत्युत्तर देण्याची दाट शक्यता आहे. मात्र हे उत्तर अमेरिकेच्या कारवाईच्या स्वरूपावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. इराणने हल्ला झाल्यास त्यांची भूमिका निश्चित करण्यासाठी लेबनॉनच्या हिजबुल्लाहशीही संपर्क साधण्यात आला आहे. त्यामुळे इराणही अमेरिकेविरूद्ध आघाडी उभारण्याची तयारी करत आहे.