सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : २१ व्या शतकातील स्मार्ट सिटी म्हणून जगभरात ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात गेले काही दिवसांपासून प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडण्यासाठी अंधश्रद्धेचा विखारी वापर केला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार दिलीप घोडेकर, सोमनाथ वास्कर यांच्या वाहनांखाली काही व्यक्तीकडून काळी बाहुली, टाचण्या आणि काळी पावडर टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रचारात वापरल्या जाणाऱ्या या प्रकारांमुळे शहरातील वैचारिक पातळी किती खालावली गेल्याची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रातील पहिले नियोजन करून तयार केलेले शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. विज्ञानाच्या आधारावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवी मुंबई शहराला देशभरात नावाजलेले तब्बल २६ पुरस्कारांनी विविध क्षेत्रात गौरवण्यात आले आहे. आता तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याने थेट लंडनमधील हिथ्रो विमानतळाची तुलना झाल्याने नवी मुंबईने जागतिक नकाशावर वेगळी छाप सोडली आहे. असे असले, तरी नवी मुंबई महापालिका निवडणुकीतील प्रचारात अंधश्रद्धेचे वेगवेगळ्या घटना उघडकीस येत असल्याने शहराची प्रतिमा खराब होऊ लागली आहे.
नेरूळ येथील प्रभाग क्रमांक २३ मधील शिवसेनेचे उमेदवार दिलीप घोडेकर यांच्या कार्यालयाबाहेर वाहनाच्या खाली काही व्यक्तींनी काळी बाहुली एका कागदाच्या पुडीत बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. घोडेकर यांनी वाहन बाजूला केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. नेमके यावेळस शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा भेट घेण्यासाठी आले होते. त्यांच्या समक्ष हा प्रकार समोर आल्यामुळे त्यांनी विरोधी पक्षातील उमेदवार टीका केली. या सर्व प्रकारांमुळे नवी मुंबईतील काही परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत प्रशासनाने योग्य कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
- सानपाडा येथील प्रभाग १९ क्रमांक सोमनाथ वास्कर यांच्या घराखाली उभे असलेल्या वाहनाच्या खाली काळ्या बाहुल्या ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. वास्कर यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवर या प्रकाराचा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
- जुईनगर प्रभाग क्रमांक २२ येथील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र सावंत यांच्या कार्यालयाबाहेर बॅनरला काही व्यक्ती लोखंडी खिळे मारून मंत्र पूटपूटत असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी सांगितले.