महापालिका क्षेत्रांत सार्वजनिक सुट्टी जाहीर
ठाणे, ता. १४ : ठाणे जिल्ह्यामध्ये गुरुवारी (ता. १५) लोकशाहीचा मोठा उत्सव साजरा होत आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहा महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, मतदारांना आपला हक्क बजावता यावा यासाठी संपूर्ण महापालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मिरा-भाईंदर या महानगरपालिका क्षेत्रांत सुट्टी असेल.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि बँका, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये या सर्व ठिकाणी सार्वजनिक सुट्टी असेल. निवडणूक प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ही सुट्टी केवळ फिरण्यासाठी किंवा आरामासाठी नसून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आहे.
सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल. त्यामुळे कोणत्याही दडपणाशिवाय आणि प्रलोभनाला बळी न पडता आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानात सहभागी होऊन लोकशाही बळकट करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.