कायदा सुव्यवस्थेचे पालन करा
esakal January 16, 2026 09:45 AM

जुन्नर, ता. १५ : ‘‘जुन्नर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. आदर्श आचारसंहितेसोबतच कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही, याची दक्षता घ्यावी; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,’’ असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी दिला. जुन्नर येथे गुरुवारी (ता. २०) पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली. यावेळी तहसीलदार डॉ. सुनील शेळके, पोलिस निरीक्षक किरण अवचर, अनंता गवारी, जगदीश खेडकर, अनिल थोरवडे, तुषार कोरडे, विजय खारतोडे यांसह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मोरे यांनी सांगितले की, जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ गट असून, पंचायत समितीचे सोळा गण आहेत. तालुक्यात निवडणुकीसाठी ३६६ मतदान केंद्र असून, ३ लाख ७ हजार २२३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये १ लाख ५१ हजार ३५५ स्त्री मतदार, १ लाख ५५ हजार ८६३ पुरुष मतदार, तर ५ मतदार हे इतर प्रवर्गातील आहेत. या निवडणुकीसाठी जवळपास १९००हून अधिक कर्मचारी मतदान व मतमोजणी केंद्रावर नियुक्त केले आहेत. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (ता. २३) प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.