पिंपरी : पन्नास रुपये देण्यास नकार दिल्याने तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रावेत परिसरातील एका चहाच्या टपरीवर घडली. मयूर अशोक लोखंडे (रा. रुपेश कॉलनी, दत्तवाडी, आकुर्डी, मूळ रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनोद ऊर्फ विन्या निजप्पा गायकवाड (रा. रमाबाई नगर, रावेत), अक्षय प्रभाकर साबळे (रा. काळभोर नगर, आकुर्डी, पुणे) व भूषण भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचा भंगाराचा व्यवसाय असून, ते रावेतमधील एका हॉटेलमध्ये बसले असताना आरोपी विनोद गायकवाड त्यांच्याकडे गेला. ‘तू खूप पैसे कमवतोस, इथे धंदा करायचा असेल तर मला पन्नास रुपये दे’ अशी त्याने मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत खुर्चीने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. तसेच तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मोटार वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
मोबाईल चोरीप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : रुग्णालयातून मोबाईल चोरणाऱ्या एकाला आळंदी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयात घडला. हनुमान सिताराम बागूल (रा. आळंदी, मूळ-रा. बोरगाव, ता. औसा, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी योगेश सुभाष जाधव (रा. महाळुंगे रोड, बाणेर, पुणे) यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुग्णालयातील एका वॉर्डचा दरवाजा उघडून आरोपी आत शिरला. फिर्यादी व त्यांचा मित्र झोपेत असताना उशाजवळ ठेवलेला सुमारे एक लाख ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला.
---