पॅनल पद्धतीचा गोंधळ, जनजागृतीचे अपयश
esakal January 16, 2026 09:45 AM

टिटवाळ्यात मतदार राजा संभ्रमात
पॅनेल पद्धतीचा गोंधळ, जनजागृतीचे अपयश

टिटवाळा, ता. १५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली पालिकेसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान पार पडले. टिटवाळा परिसरात मात्र मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि संभ्रमाची परिस्थिती पाहायला मिळाली. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पॅनेल पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवली जात असल्याने एका मतदाराला किमान चार उमेदवारांना मतदान करणे अपेक्षित आहे. मात्र ही बाब प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचली नसल्याने संभ्रमाचे वातावरण असल्याचे चित्र प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर स्पष्टपणे दिसून आले.
सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी एकच बटण दाबायचे की चार, एकाला मतदान केल्यास मत वैध राहते का, पूर्ण पॅनेलला मतदान करणे बंधनकारक आहे का, असे प्रश्न मतदारांनी उपस्थित केले. अनेक मतदार रांगेत उभे राहूनही मतदान प्रक्रियेबाबत निश्चित माहिती नसल्याने अस्वस्थ झाले होते. काही ठिकाणी मतदान करून बाहेर पडलेले मतदारही पुन्हा मतदान कर्मचाऱ्यांकडे शंका विचारताना दिसून आले. तर काही मतदारांनी आम्हाला आधीच योग्य माहिती मिळाली असती तर मतदान करताना मनात शंका राहिली नसती, अशी नाराजी व्यक्त केली. याचा थेट परिणाम काही प्रमाणात मतदानाच्या टक्केवारीवरही होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

जनताहित फाउंडेशन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रितेश कांबळे म्हणाले, की पॅनेल पद्धतीमुळे मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून, याचा सर्वाधिक फटका वृद्ध आणि प्रथमच मतदान करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. मतदान केंद्रांवर मतपत्रिका समजून घेणे, योग्य चिन्ह ओळखणे आणि सर्व उमेदवारांना मतदान करण्याची प्रक्रिया अनेकांसाठी क्लिष्ट ठरत आहे. ही पद्धत समजावून सांगण्यासाठी पुरेशी पूर्वतयारी आणि जनजागृती न झाल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
ॲड. अनिल कांबळे यांनी सांगितले, की लोकशाहीत मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो सहज, सोपा व पारदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्याच्या पॅनेल पद्धतीमुळे अनेक मतदार गोंधळात पडत असून, काही जण मानसिक गोंधळात मतदान करीत आहेत. ही गंभीर बाब आहे. भविष्यात अशा पद्धती लागू करताना सर्वसामान्य मतदार केंद्रस्थानी ठेवून निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.